मुंबई -राज्यात सत्तांतर झाल्यानंतर लगेचच नव्या सरकारला अतिवृष्टी, दरड कोसळणे, जुन्या इमारती पडणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जनतेच्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर नव्या सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय लवकरच घेण्याचे सांगितले आहे. या सर्व विषयांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांच्याशी खास बातचीत केले आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने...
नाना पटोले यांच्यांशी संवाद साधताना प्रतिनिधी राज्याने ठराव करून केंद्राकडे पाठवावा?याप्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचे सांगितले आहे. महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही सीएनजी व गॅस वरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा दिला होता. परंतु आता हे शिंदे फडणवीस सरकार पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करणार ही आनंदाची बाब आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जगभरात इंधनाचे दर कमी होत असताना, पेट्रोल व डिझेल वरील दर हे १०० रुपयांच्या वर जाणार नाहीत असा ठराव या सरकारने विधानसभेत करून तो केंद्राकडे पाठवावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. जेणेकरून जनतेला लुटण्याचे काम सुरू आहे ते थांबले जाईल असेही ते म्हणाले.
बिल्डरांच्या फायद्यासाठी मुंबईची तुंबई?२-३ दिवसाच्या पडणाऱ्या पावसाने मुंबईत ठीक ठिकाणी पाणी भरत आहे. मुंबईची तुंबई होत आहे? यावर बोलताना नाना पटोले फार आक्रमक झाले. ते म्हणाले की मुंबईमध्ये काँग्रेसचा महापौर असताना मुंबई कधीच तुंबली नाही. सेना भाजप सत्तेवर आल्यानंतर मुंबई तुंबू लागली. मुंबईत ठीक ठिकाणी भराव टाकून मोठमोठ्या इमारती उभ्या केला गेल्या. यांच्याकडे सत्ता राहिली तर मुंबई पुन्हा डुबणारच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगर विकास खात्याचा चांगला अनुभव आहे. त्यांचे जे सहकारी बिल्डर मित्र आहेत. त्यांनी ज्या ठिकाणी भराव टाकून तसेच तलाव बुजवून बिल्डिंग बांधल्या आहेत त्यांच्यावर ते कारवाई करणार का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा -Chandrashekhar Bawankule : सरपंच, नगराध्यक्षांची निवड पुन्हा जनतेतून होणार?, बावनकुळे म्हणाले...
आरेसाठी संघर्ष करणार - आरेमधील कारशेडच्या विरोधामध्ये उद्या काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन छेडले जाणार आहे? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, आरेमध्ये कारशेड करण्यास आमचा पूर्वीपासून विरोध आहे. आरेमध्ये पूर्ण जंगल असून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन निर्मिती सुद्धा होत असते. काही विशेष लोकांना फायदा करून देण्यासाठी हे जबरदस्तीने केले जात आहे. तिथे झाडे कापली जाणार आहेत. या सर्व बाबी बघता काँग्रेस ही लढाई मोठ्या प्रमाणात लढणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
वेशांतर करून फडणवीस बाहेर जायचे? शिंदे फडणवीस सरकार स्थापन होत असताना अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विश्वासदर्शक ठरावानंतर विधानसभेत बोलताना सर्व झोपल्यावर रात्री ते उठून जायचे व सर्व उठायच्या अगोदर परत यायचे असा गौप्यस्फोट केला होता. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडवणीस रात्री हुडी घालून व मोठा चष्मा घालून घराबाहेर पडायचे असा गौप्यस्फोट केला. या दोन्ही गोष्टीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मागील महिन्याभरापासून राज्यात जो काही पॉलिटिकल ड्रामा सुरू होता. त्याने राज्याच्या विकासाला खीळ बसली आहे. आसाममध्ये महापूर आला असताना झाडे, डोंगर, हॉटेल या शब्दाने जगभरात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. जो महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे, तिथे लोकप्रतिनिधी विकले जातात हे जगाला समजले आहे. देवेंद्र फडवणीस रात्री वेशांतर करून बाहेर जायचे हे आमच्या सुनबाईनी मान्य केले आहे. भाजपमुळेच हे सत्तांतर झाले. यामध्ये आता काही दुमत राहिलेल नाही. केंद्रातील ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांचा वापर करून हे सरकार स्थापन करण्यात आले आहे. पण या सरकारला जनता कधीच माफ करणार नाही, असे सांगत भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील असे नाना पटोले म्हणाले आहेत.
हेही वाचा -Shinde-Fadnavis Ministry Expansion : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार 'या' तारखेनंतर होणार
हेही वाचा -Maharashtra Rain Live : पुण्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर