मुंबई - एमएमआर भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र रेल्वेकडून आता वेळकाढूपणा केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे. राज्य सरकार, महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत महिलांविषयी निर्णय आधीच झाला होता. मात्र स्वतःच्या अधिकारात निर्णय घेता येत असतानाही जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे, असे ते म्हणाले.
17 तारखेपासून महिलांना रेल्वे प्रवास करता येणार होता. त्याच दिवसापासून नवरात्र सुरू होणार. हे सर्व माहित असताना देखील रेल्वे बोर्डाची परवानगी आधीच का घेतली नाही? याचे उत्तर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईच्या महिलांना दिले पाहिजे, असे सावंत यांनी म्हटले.
मंदिरं उघडा म्हणून बोंब ठोकणाऱ्या भाजपाला नवरात्रोत्सवात आपल्या दुर्गाशक्ती माय-भगिणींसाठी लोकल चालू होईल याची तमा नाही का? मुंबई भागातील महिलांच्या लोकल प्रवासाठी भाजपाचा आवाज बंद का? आता ते घंटानाद का करत नाहीत? असे सवाल उपस्थित करत सावंत यांनी भाजपाच्या हिंदुत्त्वावर टीका केली.
'हा' निव्वळ वेळकाढूपणा
महिलांच्या लोकल प्रवासासंदर्भात आधीच बैठक घेऊन त्यावर सविस्तर चर्चा घेऊन वेळही निश्चित करण्यात आली होती. राज्य सरकारने महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या, असे कळवले. पण आता रेल्वे विभाग हा रेल्वे बोर्डाची परवानगी लागेल, अशी कारणं देऊन वेळकाढूपणा करत आहे.