मुंबई - महाविकास आघाडीने एकत्रित पणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढवाव्यात, अशी मागणी आघाडीतील पक्षांकडून केली जात आहे. त्याचवेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ जागा लढवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. यापुर्वी देखील त्यांनी असे वक्तव्य केले होते. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर जगताप यांनी आज दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीतळाला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर जगताप बोलत होते. यावेळी बोलताना बाळासाहेब यांच्या सर्व स्मृतिदिनाला मी नेहमी येतो, राजकारणाच्या पलिकडे काही व्यक्तींचं स्थान असतं, इथे प्रेरणा मिळते, आज आणि उद्या सर्व महान व्यक्तींच्या प्रेरणा स्थळावर जाणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.
कॉंग्रेस निवडणुकीबाबत तळ्यात-मळ्यात
यापुर्वी मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा देण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये शिवसेनेची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. या निवडणुकीबाबत आमची बैठकही झाल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट संकेत जयंत पाटील यांनी सुद्धा दिले आहेत. मात्र कॉंग्रेस सुध्दा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. त्यामुळे कॉंग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या कॉंग्रेस निवडणुकीबाबत तळ्यात-मळ्यात असल्याचे चित्र आहे.