मुंबई - शिवसेनेचा पिंड हा गुंडगिरीचा असून, शिवसेना ही अजूनही गुंडापार्टीच असल्याचे काँग्रेसचे नाराज नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे. शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर निरुपम यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचा पिंड हा गुंडगिरीचा; संजय निरुपम यांचा घणाघात - शिवसेना बातमी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील व्यंगचित्र शेअर केल्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना बेदम मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील व्यंगचित्र शेअर केल्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना बेदम मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असून संजय निरुपम यांनीही सेनेवर टीका करायची ही संधी सोडली नाही. काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असे वारंवार निरुपम यांनी म्हटले होते. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला या निर्णयाने दुखावलेले निरुपम यांनी अनेकदा आपल्याच पक्षाला धारेवर धरले. तर अनेकदा शिवसेनेवर टीका केली.
आता नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असून, यावर निरुपम यांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. दरम्यान, याप्रकरणी शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, त्यानंतर या आरोपींना जामीनही मंजूर झाला आहे. या आरोपींवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याच्या कलमाखाली अटक करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.