मुंबई: ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसीय दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या नंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ममतांनी पवारांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत यूपीए वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी देशाला भक्कम आशा तिसऱ्या आघाडीची गरज व्यक्त करताना काॅंग्रेस आणि राहूल गांधी यांच्यावर टिका केली होती.
एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही
सात वर्षापासून देशांत काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष असला तरी विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावली जात नाही. थेट लोकांमध्ये उतरून काँग्रेसचे नेते काम करत नाहीत, उलट विदेशात फिरतात असा टोला नाव न घेता राहुल गांधी यांना लगावला होता. तिसऱ्या आघाडीच्या मोट बांधण्याची तयारी ममता बॅनर्जी करत आहेत. याबाबत एक डिसेंबर रोजी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तिसर्या आघाडीत बाबत या बैठकीत चर्चाही झाली. मात्र तिसरी आघाडी ही सर्वांना सोबत घेऊनच होऊ शकते. भारतीय जनता पक्षाला सत्तेतून पायउतार करायचा असल्यास सर्वांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही अशी सारवासारव शरद पवार यांनी यावेळी केली.
तर भाजपलाच पाठबळ
काँग्रेस सारख्या बलाढ्य पक्षाला वेगळा ठेवून तिसऱ्या आघाडीचा विचार करणे म्हणजे भारतीय जनता पक्षाला चार पाठबळ देण्यासारखे आहे. या आधीही ज्यावेळेस तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न करण्यात आला. त्याचा फायदा थेट सत्तेमध्ये असलेल्या पक्षाला होतो. त्यामुळे तिसरी आघाडी तयार झाली तर त्याचा फायदा थेट भारतीय जनता पक्षाला होईल असं मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले आहे. ममतांनी शरद पवार यांची भेट घेऊन काँग्रेसच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही नाराजीचा सूर काँग्रेसमध्ये उमटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हणले आहे
ममतांचे वक्तव्य काँग्रेसच्या जिव्हारी
काँग्रेसला बाजूला ठेवण्याचे ममतांनी केलेले वक्तव्य काँग्रेसच्या जिव्हारी लागले आहे.राज्यातील काँग्रेसच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावर बाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी ममतांच्या वक्तव्याचे खंडन केले आहे. भारतीय जनता पक्षाला एकमेव पर्याय काँग्रेस आहे. सात वर्षापासून आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाच्या नीतीला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे तेवढ्याच प्रखरतेने विरोध करत आहेत असे काँग्रेस नेत्यांकडून सांगितले जात आहे.
तृणमूल हाच पर्याय भासवण्याचा प्रयत्न
काँग्रेस आपल्या विरोधकांची भूमिका योग्य बजावत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्ष हा काँग्रेस नसून तृणमूल काँग्रेस आहे असा भासवण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी आपल्या मुंबई दौऱ्यातून करत आहेत. आणि म्हणूनच विरोधी पक्षाचे काम काँग्रेसने योग्यरीत्या केले नसल्याचे वक्तव्य ममतांनी केेल्याचा चिमटा भारतीय जनता पक्षाचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर ही देशामध्ये मोदी यांचे सरकार असेल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील अशा प्रकारचा प्रयोग झाला मात्र त्याचा काहीही फरक मोदी सरकारला पडला नाही असेही फडणवीस यांनी म्हणले आहे.
हेही वाचा : Pawar Support to Mamata - Fadnavis : काँग्रेसला बाजूला ठेवून मोट बांधण्यात ममतांना पवारांची साथ - फडणवीस