मुंबई -हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीकडून चौकशी बाबतीत समन्स पाठवण्यात आले आहेत. चौकशीसाठी हजर राहण्याबाबत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ईडीकडून वेळ मागितला आहे. मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी ( Sonia Gandhi and Rahul Gandhi ED Summons ) यांना हेराल्ड प्रकरणात ( National Herald Case ) ईडीकडून समन्स बजावल्या विरोधात देशभरातल्या ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस ( Congress agitation outside ED office ) कार्यकर्ते धरणे आंदोलन करणार आहे. उद्या ( सोमवार ) दुपारी 12 वाजता महाराष्ट्रात असलेल्या मुंबई, नागपूर ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसकडून निदर्शने करण्यात येणार असल्याचे माहिती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.
या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नसून नॅशनल हेराल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभ अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे केवळ गांधी कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रकार आहे. परंतु काँग्रेस पक्ष भाजपा सरकारच्या या दडपशाहीसमोर झुकणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.
नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राची स्थापना १९३७ साली पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पुरुषोत्तम टंडन, आचार्य नरेंद्र देव, रफी अहमद किडवई या महान नेत्यांनी केली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राने मोलाची भूमिका बजावत देशाची सेवा केली. इंग्रज सरकारने या वृत्तपत्रावर १९४२ ते १९४५ दरम्यान बंदी घातली होती. स्वातंत्र्यानंतरही लोकशाही, संविधान व काँग्रेसचा विचार पुढे चालू ठेवण्यासाठी हे वर्तमानपत्र तोट्यात असतानाही चालूच ठेवले होते. या वर्तमानपत्रातील पत्रकार, कर्मचारी यांचा पगार देता यावा यासाठी काँग्रेस पक्षाने नॅशनल हेराल्डला २००२ ते २०११ दरम्यान ९० कोटी रुपये १०० हप्त्यात कर्जाने दिले. अशा प्रकारे कर्ज देणे कोणत्याही कायद्याखाली बेकायदेशीर नाही. हा सर्व व्यवहार पूर्ण पारदर्शक आहे. यात कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणालाही लाभ झालेला नसताना मनी लाँडरिंगचा गुन्हा कसा होतो ? असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला.
केंद्रातील भाजपाचे सरकार, महागाई, पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, रुपयाची घसरण, अर्थव्यवस्थेची घसरगुंडी, काश्मीर पंडितांची हत्या व पलायन या मुख्य मुद्यांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी असे मुद्दे उकरून काढत आहे. गांधी कुटुंबाला भाजपा नेहमीच बदनामी करत आला आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांना सातत्याने बदनाम करण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु असल्याचे लोंढे यावेळी म्हणाले.
हेही वाचा -राष्ट्रपतीपद निवडणूक : सोनिया गांधींनी साधला शरद पवार, ममता बॅनर्जींशी संपर्क