मुंबई- सोमवारी महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहे. यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज असल्याची माहिती आज मुंबई जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे मुंबई शहर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदार संघ येतात. यात दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान करण्यासाठी 11 ओळख पत्रांचा वापर केला जाऊ शकतो.
मुंबई जिल्ह्यात 2606 मतदान केंद्रे
मुंबई दक्षिण मध्य 1572 व मुंबई दक्षिणमध्ये 1578 मतदान केंद्रे आहेत. मुंबई शहर जिल्ह्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे. यात 12 पोलिस उपायुक्त, 46 सहाय्यक पोलीस आयुक्त, 1008 वर्ग 1 व 2 चे अधिकारी, 8579 पोलिस कर्मचारी, तसेच 4-सीपीएसएस व 4 राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या व 2310 होमगार्ड यांचा समावेश आहे.
मतदान यंत्रे
बॅलेट युनिट्स 5638(117%),
कंट्रोल युनिट्स 3764 (114%), व 4273 (129%) व्हीव्हीपॅट आहेत. मतदार संघनिहाय मुंबई दक्षिण मध्य बॅलेट युनिट्स 3655, कंट्रोल युनिट्स 1795 व 1979 व्हीव्हीपॅट आहेत. तर मुंबई दक्षिणमध्ये बॅलेट युनिट्स 1870, कंट्रोल युनिट्स 1805 व 2090 व्हीव्हीपॅट आहेत.
ही मतदान यंत्रे ने-आण करणाऱ्या वाहनांवर जीपीएसद्वारे सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जीपीएस मॉंनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला आहे. 15 हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.
18 कोटी 14 लाख 87 हजार रुपये संशयित रक्कम जमा तर १५ आचार संहिता भंगाचे गुन्हे
मुंबई शहर जिल्ह्यात आतापर्यंत 18 कोटी 14 लाख 87 हजार रुपये संशयित रक्कम जमा झाली असून त्यातील मुंबई दक्षिण मध्यमध्ये 3 कोटी 28 लाख 25 हजार व मुंबई दक्षिणमध्ये 14 कोटी 86 लाख 62 हजार रक्कम आहे. तसेच आचार संहितेचेही 15 गुन्हे दाखल झाले असून ते अनुक्रमे 7 व 8 असे असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.