मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज (सोमवार) विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुले उपस्थित होती. एकंदरीत ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा...विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, मुख्यमंत्र्यांसह आघाडीचे उमेदवार दाखल करणार अर्ज
महाविकास आघाडीकडून चार उमेदवारी अर्ज दाखल..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसचे राजेश राठोड हे दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांनी यापुर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.