महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्री भडकले; म्हणाले.. केवळ सादरीकरणासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक नाही

मागील वर्षी बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप उद्दीष्टपूर्तीच्या आकडेवारीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच भडकले. यावेळी त्यांनी बँकांनी संवेदनशिलता दाखवत बँकांनी पतपुरवठा करण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : May 29, 2019, 7:38 PM IST

मुंबई - राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बँकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षीत आहे. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बँकांनी पतपुरवठा करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिले. यावेळी त्यांनी पीक कर्जाच्या उद्दीष्टपूर्तीची आकडेवारीवरुन नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी


सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस कृषीमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, यांच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


सन 2019-20 साठीच्या मंजूर केलेल्या 4 लाख 24 हजार 29 कोटी रुपयांच्या एकूण वार्षिक पतपुरवठा आराखड्यात कृषीक्षेत्रासाठी 87 हजार 322 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
गेल्या वर्षीच्या पीक कर्जाच्या उद्दीष्टपूर्तीची आकडेवारी पाहून मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकूण उद्दीष्टाच्या केवळ 54 टक्केच उद्दीष्ट साध्य झाले, ही गंभीर बाब असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केवळ सादरीकरणासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक नाही. या बैठकीत जे निर्णय घेतले जातात ते बँकांनी त्यांच्या क्षेत्रीय स्तरावरील शाखांपर्यंत पोहोचवले पाहिजे. बँकांनी शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवावी. उद्दीष्टपूर्तीसाठी जबाबदारी निश्चित करावी. बँकांच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्यावी. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, जेणे करून शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना अडचणी येणार नाहीत.


शाश्वत शेतीसाठी कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. बँकांचे पीक कर्जाचे उद्दीष्ट आणि साध्य यात तफावत असू नये. शेतकऱ्यांप्रती असणारी भावना बँकांनी बदलणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करतानाच जास्तीत जास्त पीक कर्जाचे वाटप झाले पाहिजे. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती ग्रामीण भागातील बँकांच्या शाखांपर्यंत पोहोचावी यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


केंद्र शासनाच्या मुद्रा बँक, प्राधानमंत्री जनधन योजना, स्टॅण्ड अप इंडिया, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना यासारख्या योजनांमधील पतपुरवठ्याची कामगिरी देखील सुधारली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


कृषी मंत्री पाटील म्हणाले, क्षेत्रियस्तरावर होणाऱ्या बैठकांना बँकांनी वरिष्ठ अधिकारी पाठवून आहे, त्याच ठिकाणी अडचणींवर मार्ग काढावेत. शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा स्थानिकस्तरावरच झाला, तर त्यांना दिलासा मिळेल. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवितानाच जून-जुलै महिन्यात अतिरिक्त कर्मचारी नेमून पीक कर्ज वेळेवर मिळण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विविध राष्ट्रीयकृत बॅकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यस्तरीय बँकर्स समिती बैठक
२०१९-२० पीक कर्ज वाटप उद्धिष्ट - एकूण ५९,७६६ कोटी
खरीप हंगाम - ४३,८४४ कोटी
रब्बी हंगाम - १५,९२१ कोटी
गेल्यावर्षीचे उद्धिष्ट आणि साध्य -
५८,३३१ कोटी; ३१,२८२ कोटी - ५४%

ABOUT THE AUTHOR

...view details