मुंबई -पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे, अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील,याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले आहेत.
सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या राज्यस्तरीय मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह विविध विभागाचे सचिव, तीनही सैन्य दलाचे अधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पावसाळ्यातील तयारीसंदर्भात सर्व यंत्रणांनी चांगली तयारी केली आहे. या काळात पुनर्वसन आणि योग्य तयारी केल्यास संभाव्य आपत्ती टाळू शकतो. मागील काही वर्षांत सर्व यंत्रणांनी पावसाळ्यात चांगल्या प्रकारे काम केले आहे. त्या अनुभवावरून पुढील काळात आणखी चांगले काम करता येईल. मात्र, त्यावरच अवलंबून न राहता, संस्थागत ज्ञान, अनुभव आणि दूरदृष्टी ठेवून योग्य तयारी केल्यास आपत्ती टाळता येईल. या काळात मुंबई बरोबरच नागपूर, नाशिक, पुणे या शहरांमधील पूर परिस्थिती, धोकादायक इमारतींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शहरांमध्ये पावसाचे पाणी साचू नये, तसेच पावसामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी कमांड आणि कंट्रोल रुमच्या माध्यमातून सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात यावे. मुंबईमधील धोकादायक तसेच नादुरुस्त रेल्वे पूल, इमारती याबद्दल महापालिका आणि रेल्वे विभागाने समन्वयाने निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आपत्ती निवारण दलाच्या पथकाने सतर्क रहावे. तसेच आपत्ती काळात वापरण्यात येणारी यंत्रे, साधने ही सुस्थितीत असतील याची काळजी घ्यावी. तसेच आपत्ती घडल्यानंतर त्या ठिकाणी कमीत कमी वेळेत मदत पोहचावी यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. आपत्ती प्रतिसाद केंद्रातील संपर्क यंत्रणा २४ तास सतर्क राहतील आणि त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित असतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.