मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत, महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती सुधारत असल्याचे म्हटले आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनमुळे रुग्ण संख्येत सातत्याने घट होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच राज्यात ऑक्सिजनची असलेली उपलब्धता, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा आणि लसीकरणात होत असलेला विलंब याबाबत देखील त्यांनी माहिती दिली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचे सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक झाल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील कोरोना स्थिती
दि. २५ एप्रिल, २०२१ रोजी राज्यात ६.९८,३५४ इतके सक्रिय रुग्ण होते. तर दि. ०४ मे, २०२१ अखेर राज्यात ६,४१,९१० इतके सक्रिय रुग्ण आहेत. तथापि, रुग्णसंख्या घटत असली तरीही ही घट राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकसमान नाही. रत्नागिरी, बुलढाणा, परभणी, बीड, सिंधुदुर्ग, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यांत वाढ होत आहे. तर मुंबई, ठाणे, धुळे, नांदेड या जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात घट दिसून आली. कोविड १९ च्या पहिल्या लाटेपेक्षा सर्व जिल्ह्यांमध्ये बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. यात परभणी, चंद्रपूर, नंदुरबार, वाशिम, भंडारा, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यांमध्ये ही वाढ तिपटीपेक्षाही अधिक आहे. राज्याने वेळोवेळी निर्बंधाबाबत घेतलेले निर्णय व युध्दपातळीवरील उपाययोजना यामुळे राज्यातील मृत्यूदरात घट झालेली आहे. आजघडीला राज्यातील मृत्यूदर १.४९% इतका आहे.
उपलब्ध आरोग्य व्यवस्था
राज्य आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावरही भर देत आहे. राज्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. राज्यात आजघडीला कोविड रुग्णोपचारासाठी ४४६६३९ आयसोलेशन बेड्स, जवळपास १ लाख ऑक्सिजन बेड्स, ३०४१९ आय.सी.यु. बेड व 12 हजार 179 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत.
18 ते 44 वयोगटातील लसीकरण
राज्याने कोविड प्रादुर्भावापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या लसीकरणासाठी जवळपास ७,८०००० लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. आजमितीस या मात्रा जरी कमी असल्या तरी केंद्र शासन व लस उत्पादक कंपन्यांशी दररोज चर्चा करुन अधिकाधिक लस साठा उपलब्ध करुन नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. साधारणतः १ महिन्याच्या कालावधीत राज्याला पुरेसा लस साठा उपलब्ध होऊन लसीकरण सुरळीत होईल, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
45 वर्षांवरील लसीकरण
४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणामध्येही आज राज्य संपूर्ण देशात आघाडीवर आहे. कालपर्यंत राज्यात जवळपास १ कोटी ६५ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा देण्यात आल्या आहेत. या वयोगटात काही जिल्ह्यांत ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत नागरिकांनी लसीचा किमान १ मात्रा घेतल्याचे दिसून येते (कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नागपूर इ.) तथापि, काही जिल्ह्यांत हे प्रमाण २० टक्के इतके आहे. लसीकरण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये (हिंगोली, बीड, गडचिरोली, जळगाव, सोलापूर, नंदुरबार, परभणी ) या जिल्ह्यांचा समावेश होतो. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
"महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन"
ऑक्सिजनची निर्मिती, साठवण आणि वितरण या बाबत महाराष्ट्राला स्वावलंबी बनविण्यासाठी "महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन" ही मोहीम सुरू कण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रत १८०० मेट्रिक टनची आवश्यकता असून, यापैकी १२९५ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती महाराष्ट्रत होत आहे. महाराष्ट्राला सध्या स्थितीमध्ये 500 मे. टन ऑक्सिजनची कमतरता भासत असून, ही कमतरता इतर राज्य आणि केंद्रांच्या मदतीने भरून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी राज्यात सुमारे ३८२ अतिरिक्त ऑक्सिजन प्लांटसची स्थापना करण्यात येत आहे. त्यातून जवळपास २४० मेट्रिक टनची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असून, सर्व प्लांटस जून अखेरील सक्रिय होतील. या उपक्रमामुळे राज्यातील हॉस्पिटल्स ऑक्सिजनबाबत स्वावलंबी होतील.
हेही वाचा -मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित - अजित पवार