मुंबई - राज्यात कोविड योध्दांचा सत्कार समारंभ सुरु आहे. मात्र, कोविड आपल्यातून गेलेला नाही, याचे भान ठेवायला हवे. निदान कोविड योध्दा होता नाही आले तरी, कोविड दूत बनू नका, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपला लगावला. तसेच हे उघडा ते उघडा म्हणून आंदोलन करणारे संसर्ग वाढत असताना वाचवायला येणार नाहीत, अशा सूचना जनतेला करताना भाजपला खडेबोल सुनावले.
मुख्यमंत्र्यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला आंदोलन करणारे वाचवायला येणार नाहीत-
राज्यात कोरोनाचा प्रसार कमी होताच, काही जण हे उघडा ते उघडा म्हणून काहींनी आंदोलने केली. आपण मंदीर उघडली, लोकल सुरु केली. आपण फिरायला लागलो. परंतु, पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. सुरुवातीच्या काळात अनेक कोविड योद्ध्यांनी जीवाची बाजी लावून अहोरात्र मेहनत घेत, कोरोना आटोक्यात आणला. काही योद्ध्यांनी बलिदान दिले. ही हृदयद्रावक घटना आहे. अशातच काहीजण कोविड योद्ध्यांचा सत्कार करत आहेत. सत्कार हा झालाच पाहिजे. परंतु, कोविड अद्याप गेलेला नाही, याचे भान ठेवायला हवा. गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे कोविड योध्दा होता आले नाही तरी चालेल, पण कोविड दूत होऊ नका, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राज्यपाल यांचे नाव न घेता दिला आहे.
तसेच सर्व काही खुले करा म्हणून नियम मोडून आंदोलने करणारे आता जेव्हा संसर्ग पसरतोय तेव्हा वाचवायला येणार नाहीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केल्या. “पाश्चिमात्य देशांमध्ये लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहे. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन आहे. संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ देऊ नका-
गेले वर्षभरापासून आपण कोरोनाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. त्यात आपल्याला यशही आले. मात्र, आज दिवसभरात सुमारे ७ हजार रुग्ण आढळले ही चिंताजनक बाब आहे. गेल्यावर्षी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडे सुविधा नव्हत्या, ऑक्सिजन, बेड्स, रुग्णालये, प्रयोगशाळा पुरेशा नव्हत्या. पण आता सुविधांनी आपण सज्ज आहोत. मात्र आता वाढत चालवलेला संसर्ग आपण थांबविला नाही तर या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येईल. एकीकडे आपण सगळे खुले करून अर्थचक्राला गती देत आहोत. लोक बिनधास्तपणे नियम मोडून फिरताहेत आणि दुसरीकडे आपण प्रशासन आणि एकूणच यंत्रणेला चाचण्या आणि रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क वाढविण्यास सांगतो आहोत. हे बरोबर नाही. सामाजिक जबाबदारी ठेऊन वागणे महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यानी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा विवाहाचा स्वागत सोहळा रद्द करून कोरोनाचे भान ठेवले, यासाठी त्यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र थांबला नाही-
कोविडचा प्रभाव असताना देखील महाराष्ट्र थांबला नाही. २ लाख कोटीपर्यंत गुंतवणूक महाराष्ट्राने आणली. एमएमआरडीएच्या काही प्रकल्पांना सुरुवात झाली. पर्यटन असो किंवा कृषी क्षेत्र असो आपण विकासाची कामे सुरूच ठेवली. भूमिपूजने झाली, कृषी पंपांना वीज दिली, मी विदर्भात, मराठवाड्यात गेलो, जव्हारला भेट दिली. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग १ मे पासून नागपूर-शिर्डी वाहतुकीस सुरु करतो आहोत. कामे थांबणार नाहीत. मात्र आता गर्दी होणार, असे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. तर ते कार्यक्रम ऑनलाईन होतील. म्हणजे संसर्गाला आमंत्रण मिळणार नाही यादृष्टीने मी सूचना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधानांसमवेत नीती आयोगाच्या बैठकीत आपण कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत धोरण आखावे, अशी मागणी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा-मुंबई : टॅक्सी व रिक्षा भाडेवाढीसंदर्भात उद्या एमएमआरटीएची बैठक