मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (रविवारी) औरंगाबादमध्ये मोठी सभा होत आहे. या सभेच्या पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी मनसेवर निशाणा ( Criticized MNS Raj Thackeray ) साधत जहरी टीका केली आहे. आम्ही झेंडा बदलला नाही तसेच असे भोंगाधारी, पुंगाधारी फार पाहिले आहेत, अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर ( MNS chief Raj Thackeray ) निशाणा साधला आहे. एका खासगी वाहिनीशी बोलताना त्यांनी टीका केली आहे.
मनसे व राज ठाकरेंवर टीका :राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उत्तरावण्याबाबत ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलेले आहे. त्यातच आज ते औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेत आहेत. या विषयाला धरून मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेवर निशाणा साधत, असे नवीन खेळाडू कुठल्यातरी मैदानामध्ये कोणते खेळ खेळतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवल आहे. कधी मराठीचा, कधी हिंदुत्वाचा खेळ सुरू आहे. असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत. दोन वर्षाचा कालखंड हा प्रचंड मोठा होता. त्या दरम्यान सर्व बंद होते. नाटक, थिएटर, सिनेमा सगळं बंद होते. त्या कारणाने आता लोकांना फुकटात जर करमणूक करून मिळत असेल तर ती का नको? असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना लगावला आहे. भोंग्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की आवाजाची मर्यादा सर्वांनाच पाळावी लागेल. पण याबाबत राजकारण केले जात आहे. हिंदुत्व आणि मराठीचा खेळ करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही, असे सांगत सरकार पाडण्याचा आटापिटा उगीचच कोणी करू नये. शिवसेनेने कधी झेंडा बदलला नाही. इतरांना झेंडे का बदलावे लागतात ते त्यांनी तपासून पाहावे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितल आहे. स्वतःकडे मोठेपणा नसल्याने शेजारच्याचे कौतुक करण्यासाठी शेजारी-पाजारी शोधावे लागतात, हे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राचा कौतुक करण्याचा मोठेपणा राज ठाकरेंकडे नाही, असे सांगत सध्या मार्केटिंगचा जमाना आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
'पेट्रोल स्वस्त केल्याने कोरोना जातो, माहित नव्हते' :कोरोना संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत विनाकारण पंतप्रधानांनी महाराष्ट्राला उगाचच डिवचले, असे सांगत पेट्रोल स्वस्त केल्याने कोरोना निघून जाईल, हे मला माहित नव्हते, अशी कोपरखळीही त्यांनी या प्रसंगी लगावली. वेळ पडल्यास महाराष्ट्र लढायला तयार आहे. 2017 ला झालेल्या युतीच्या चर्चा शिवसेनेला माहित नव्हत्या. मराठी नंतर आता हिंदुत्वाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. महाराष्ट्रबाबत सूडाने वागू नका. रिकाम्या थाळ्या वाजवून कोरोना गेला नाही, असेही त्यांनी केंद्र सरकारला ठणकावत मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.