मुंबई -विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. मात्र त्यांच्या अंतर्गत कुरबुरीमुळे लगेचच नवे सरकार स्थापन होऊ शकले नाही. या अवस्थेत सापडलेल्या राज्याच्या नव्या सरकारचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची चिन्हे दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. 105 आमदार असलेल्या भाजपला राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती फडणवीस करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... आदित्य ठाकरेंच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली
रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचा सभागृह नेता निवडण्यासाठी बुधवारी विधानभवनात पक्षाच्या सर्व 105 नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे. याच प्रमाणे बुधवारी 30 ऑक्टोबरला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत येणार असून ते मातोश्रीवर जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोमवारी राज्यपालांना भेटत असून ते कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... अपक्षांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ पोहचले ६० वर
शिवसेना नेत्यांची भेट परस्पर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमाणेच शिवसेना नेते दिवाकर रावते हे देखील सोमवारी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना भेटणार आहेत, मात्र रावते हे मुख्यमंत्र्यांसोबत न जात वेगळी भेट घेणार आहेत.