मुंबई -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि इतर मंत्री यांनी सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असे आवाहन यावेळी सर्वांनी केले.
'देश सार्वभौम ठेवण्याचे श्रेय बाबासाहेबांना'
डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचे संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे सांगितले.
'राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य'
डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. चैत्यभूमीवर दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या बंधू-भगिनींनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वंदन केले आहे. बाबासाहेबांना अपेक्षित असलेले अनुयायी तुम्ही खऱ्या अर्थाने आहात हेदेखील दाखवून दिले, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना संकटामुळे यंदा या अनेकांनी आपल्या घरूनच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याबद्दल त्यांचेही आभार उपस्थित सर्व मान्यवरांनी मानले.