मुंबई -राज्यात अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला आहे. त्यांची अमंलबजावणी तसेच केंद्र शासनाकडून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या एनडीआरएफच्या मदत निकषात वाढ करण्यात यावी, यासाठी विविध पातळ्यांवरून पाठपुरावा सुरु आहे. याशिवाय पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये. त्याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतही तज्ज्ञांशी आणि यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) सांगितले. पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्य सरकारवर आर्थिक बोजा वाढला असल्याकारणाने सध्या ती मदत राज्य सरकार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होऊ शकत नाही. मात्र परिस्थिती सुधारताच लवकरात लवकर ही मदत देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासमवेत बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
बैठकीत पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात निर्माण झालेली पूरस्थिती, पूरबाधितांना नुकसान भरपाई व त्यांचे पुनर्वसन याबाबत राजू शेट्टी तसेच खासदार माने यांनी मांडणी केली. सन २०१९ या वर्षी शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने जी मदत केली आहे. त्याच धर्तीवर आताही मदत करण्यात येईल. जुलै महिन्याच्या सुरूवातीला राज्यात पडलेला अचानक पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात कोरोनाच्या संकटाबरोबरच नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यात कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस त्याचबरोबर मराठवाडा, खान्देश व विदर्भ या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळोवेळी येणाऱ्या आपत्तीत लोकांचे होणारे नुकसान पाहून आपत्तीग्रस्तांना देण्यात येणारी तत्काळ मदत शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिकची मदत दिली, असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.