महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जुहू चौपाटीवर यंदा छटपूजेचे आयोजन नाही; 'जुहू चौपाटीवर जाऊ नका, घरातच करा छटपूजा' - महापौर किशोरी पेडणेकर

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्रकिनारी छट पूजा करण्यास मनाई केली आहे. मुंबईत बिहारी व झारखंडमधील लोक मोठ्या प्रमाणात राहतात. छटपूजेच्या वेळी ते मुंबईतील जुहू चौपाटीपर एकत्र येत असतात. परंतु यावर्षी ते जुहू किंवा मुंबईतील अन्य कोणत्याही चौपाटीवर छटपूजा करू शकणार नाहीत. काँग्रेसचे नेते व छटपूजेचे आयोजक संजय निरूपम यांनीही यावर्षी घरीच छटपूजा करण्याचे आवाहन केले आहे.

chhath pooja not allowed at mumbai
जुहू चौपाटीवर यंदा छटपूजेचे आयोजन नाही

By

Published : Nov 18, 2020, 3:19 PM IST

Updated : Nov 18, 2020, 3:35 PM IST

मुंबई - यंदा ‘कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर बिहार, झारखंड आणि उत्तर भारतीय समुदायाद्वारे साजऱ्या होणारा छटपूजेचा कार्यक्रम समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यास पालिकेने बंदी घातली आहे. त्यानुसार यावर्षी जुहू चौपाटीवर छटपूजेचे आयोजन केले जाणार नाही. छटपूजा घरात करून घरातच बादलीमध्ये छटपूजेचे निर्माल्य विसर्जन करावे कोणीही जुहू चौपाटीवर जाऊ नये, असे आवाहन माजी खासदार व छटपूजेचे आयोजक संजय निरुपम यांनी केले आहे. तर छटपूजेचा कार्यक्रम आपल्या घरात आणि सोसायटीत करा असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

छटपूजा आयोजनासंदर्भात बोलताना संजय निरुपम व महापौर पेडणेकर

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने महापालिकेने यंदा सर्वच धार्मिक सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले. त्यानुसार सर्वधर्मियांनी धार्मिक सण साधेपणाने साजरे केले. बिहार, झारखंड आणि उत्तर भारतीय समुदायाद्वारे साजरा होणारा छटपूजेचा सण येत्या शुक्रवारी व शनिवारी २० व २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या छटपूजेचे कार्यक्रम समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणाऱ्या आयोजनांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. यावर संजय निरुपम बोलत होते.

जुहू चौपाटीवर जाऊ नका -
यावेळी बोलताना छटपूजेच्या कार्यक्रमाचे मी गेले 25 वर्ष आयोजन करत आहे. यंदा कोरोना विषाणूचा प्रसार असल्याने मी यंदा जुहू चौपाटीवर कार्यक्रमाचे आयोजन करणार नाही. मी स्वताची जुहू चौपाटीवर जाणार नाही. माझ्या घरातच छटपूजा करणार असल्याचे संजय निरुपम म्हणाले. छटपूजा करणाऱ्या सर्व नागरिकांनी आपल्या घरातच पूजा करून घरात बादलीत पाणी घेऊन त्यात छटच्या साहित्याचे विसर्जन करावे कोणीही जुहू चौपाटीवर जाऊ नये असे आवाहनही निरुपम यांनी केले आहे.

छटपूजाही घरातच साजरी करा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छटपूजा करणाऱ्या माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी छटपूजेला चौपाटीवर एकत्र येण्यास यंदा बंदी घालण्यात आलीय. छटपूजा होणार, मात्र ती आपापल्या घरी, सोसायटीत, पाण्याचं कुंड तयार करून तिथे पूजा करावी किंवा पालिका काही ठिकाणी कुंड तयार करणार आहे, तिथे गर्दी न करता पूजा करावी. जसे गणपती, नवरात्री, दिवाळी आपण नियमात राहून सण साजरा केला, तसंच छटपूजा देखील करायची आहे, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

सूचनांचे काटेकोरपणे पालन करा -
या सणाच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी नागरिक समुद्रकिनारी, तलावाच्या काठी किंवा नदीकिनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. तथापि, यंदा ‘कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर तसेच कोविडची दुसरी लाट येण्याची असलेली शक्यता लक्षात घेऊन यंदा विविध सण साजरे करताना नागरिकांनी शारीरिक दूरीकरण पाळणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे इत्यादीबाबत जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य छटपूजेच्या वेळी देखील करावे आणि बृहन्मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन यानिमित्ताने अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सबंधित संस्थांना सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या या महापालिकेच्या विभाग स्तरावरुन देण्यात येणार आहेत. तसे परिपत्रक काढण्यात आल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

छट पूजेसाठी सरकारची नियमावली -

  • १. समुद्रकिनारी छटपूजेस होणारी गर्दी लक्षात घेता ‘कोविड – १९’ मार्गदर्शक तत्त्वांचे विशेषत: सामाजिक अंतर राखणे इ. चे पालन होणार नाही, त्यानुषंगाने समुद्रकिनारी सामूहिक छटपूजेची परवानगी देण्‍यात येणार नाही. त्‍यामुळे अशा ठिकाणी भाविक जमा होणार नाहीत, याची पोलीस विभागाने दक्षता घ्‍यावी.

    २. छटपूजेसाठी सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या विभाग स्तरावरुन देण्यात येतील.

    ३. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी जमू नये यासाठी स्थानिक पातळीवर पोलिस विभागाची मदत घेण्यात यावी, तसेच अशा ठिकाणी भाविकांना फक्त पूजेसाठी परवानगी द्यावी.

    ४. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विभाग स्तरावर ‘कोविड – १९’ करिता वैद्यकीय पथक ठेवण्यात यावे व आवश्यकतेनुसार भाविकांची चाचणी (Antigen / PCR Testing) करण्यात यावी.

    ५. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात यावे.

    ६. अशा ठिकाणी ध्वनि प्रदूषण होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्‍लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
Last Updated : Nov 18, 2020, 3:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details