मुंबई - ठराविक लोकांना खूश करण्यासाठी चंद्रपूरच्या खासदारांनी दारूबंदी मागे घेण्याची मागणी करू नये, असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दारूबंदीचा निर्णय लोकभावना लक्षात घेऊन केला आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या लोकप्रतिनिधींनी दारूबंदी मागे घेण्याची मागणी करू नये. जिल्ह्यात दारूबंदी कायम राहील, अशा शब्दात बावनकुळेंनी काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना प्रत्युत्तर दिले.
दारूबंदी ही स्थानिक जनभावना असून यात राजकारण नको, असे बावनकुळे म्हणाले. धानोरकर यांनी दारूबंदी उठवण्याची मागणी अधिकृतपणे केलेली नाही. त्यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. कोणत्या समाजघटकांचा त्यांनी अभ्यास केला हे माहीत नाही. दारूबंदीचा धोरणात्मक निर्णय विचाराअंती घेतला असून यात बदल होणार नाही. जिल्ह्यात दारूबंदी होती आणि पुढेही राहणार आहे. दारूबंदी ही स्थानिक जनभावना असून यात राजकारण नको, असे ही ते यावेळी म्हणाले.
काय आहे प्रकरण-
चंद्रपूरमध्ये दारूबंदी केल्यामुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळेही दारूबंदी हटवा, अशी मागणी महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकरांनी केली होती. एका जिल्हात दारूबंदी करुन काहीही साध्य होणार नाही. तुमच्या हातात महाराष्ट्राची आणि संपूर्ण देशाची सत्ता आहे त्यामुळे पूर्ण राज्यात दारूबंदी करायला हवी, असेही ते म्हणाले होते.
वणी विधानसभा मतदारसंघात बाळू धानोरकर यांचे दारुचे दुकान आहे. त्यामुळे त्याच्यावर लोकसभेच्या निवडणुकात टीका झाली होती. विरोधकांनी धानोरकरांना दारूवाला म्हणून हिणवत जनतेला दारूवाला पाहिजे का, दुधवाला असा प्रचार केला होता. मात्र, तरीही ते या निवडणुकीत विजयी झाले.