मुंबई -मुंबई लोकल ट्रेनमध्ये खुलेआम अमली पदार्थांचे सेवन करण्याचा व्हिडिओ नुकताच समाज माध्यमांवर व्हायरल झालेला होता. त्यानंतर रेल्वेच्या कार्यपद्धतीवर प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने धुम्रपान विरोधी सुरक्षा मोहिमेत हाती घेतली असून अवघ्या दोन दिवसांत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 160 व्यक्तींवर कारवाई केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
अवघ्या दोन दिवसात कारवाई -हार्बर मार्गावरील पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये गुरूवारी (दि. 24 फेब्रुवारी) सकाळी 9 वाजून 17 मिनिटांत एका प्रवासी गटाकडून अमली सदृश पदार्थाचे सेवन करत असल्याची घटना घडली. याला इतर प्रवाशांनी विरोध केला. मात्र, त्याचा प्रकार सुरूच राहिला. आम्हाला काही फरक नाही पडणार, आताच तुरूंगातून जाऊन आलो आहे, असे त्या गटातील एक जण बोलला. तसेच सहप्रवाशांबरोबर हुज्जत घातली. दरम्यान, एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ काढून समाज माध्यमावर व्हायरल केला. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या विभागाने या व्हिडिओची दखल घेतली आहे. तसेच, आरपीएफकडून या घटनेची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या सर्व गाड्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. 24 आणि 24 फेब्रुवारी, 2022 या दोन दिवसांत धुम्रपान विरोधी सुरक्षा मोहिमेत 160 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.