मुंबई -मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या रेस्टॉरंट ऑन व्हिल्सला पर्यटक आणि मुंबईकरांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात रेस्टॉरंट ऑन व्हिल्सला अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी भेट दिली आहे. ज्यामध्ये प्रवाशांना आणि पर्यटकांना रेल्वेच्या डब्यात बसूनच खाद्य पदार्थांची चव चाखली आहे. विशेष म्हणजे रेल्वेचा या रेस्टॉरंट ऑन व्हिल्सला मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद बघता इतर रेल्वे स्थानकांतही रेस्टॉरंट ऑन व्हिल्स संकल्पना लवकरच राबविण्यात येणार आहे.
रेल्वेने दिली माहिती
मध्य रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या १८ नंबर प्लॅटफॉर्मबाहेर रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू झाले आहे. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेला रेल्वे डब्यात तयार केले आहे. यामध्ये ४० जणांना बसण्याची सोय आहे. येथे प्रवासी, पर्यटकांना व्हेज आणि नान व्हेज दोन्हीचा आस्वाद घेता येणार आहे. मध्य प्रदेश रेल्वे टूरिझम कॉर्पोरेशनेही रेल कोच रेस्टॉरंट सुविधा सुरू केली. आसनसोल विभागातही रेस्टॉरंट ऑन व्हिल्स संकल्पना राबवली आहे. दोन्ही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या १८ नंबर प्लॅटफॉर्मबाहेर सुरू झालेल्या रेस्टॉरंट ऑन व्हिल्सलासुद्धा पर्यटक आणि नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कालपर्यंत २ हजार २०० नागरिकांनी या रेस्टॉरंटमधून खाद्य पदार्थांची चव चाखली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंह यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.
'या' स्थानकांत होणार रेस्टॉरंट ऑन व्हिल्स
सीएसएमटी स्थानकांवर सुरू झालेल्या रेस्टॉरंट ऑन व्हिल्ससुद्धा पर्यटक आणि नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद बघता आत एलटीटी, कल्याण, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरीसह पश्चिम रेल्वे मार्गावरील बांद्रा टर्मिनस, बोरीवली आणि सुरत स्थानकातही रेस्टॉरंट ऑन व्हिल्स संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार या स्थानकात जुन्या कोचचे रुपांतर रेस्टॉरंटमध्ये करण्यात येणार आहे. तसेच मुंबई दर्शनाकरिता येणाऱ्या पर्यटकांना याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.