मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाईसाठी राजकीय दबावातून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी केला. सह्याद्री अतिथीगृहावरील मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राजकीय दबावातून तपास यंत्रणांचा वापर
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वसूली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. देशमुख यांना लूकआऊट नोटीस ईडीने बजावली आहे. मात्र देशमुख चौकशीला हजर राहिले नाही. ईडीकडून वारंवार समन्स पाठवण्यात येत आहेत असा प्रश्न मलिक यांना विचारण्यात आल्यावर देशमुख भारतात आहेत, कुठेही गेलेले नाही असे मलिक म्हणाले. त्यांना कोणतीही लूकआऊट नोटीस बजावलेली नाही. उलट वारंवार समन्स दिले जात आहे. राजकीय दबावातून केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जातोय, असा आरोप मलिक यांनी भाजपचे नाव न घेता केला. या प्रकरणी कायदेशीर लढा देत असून अनिल देशमुख या प्रकरणातून निश्चित बाहेर पडतील, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.
बारा आमदारांचा निर्णय रद्द करु शकत नाही
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन नवाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले. बारा आमदारांच्या राज्यपाल नियुक्तीबाबत कायद्यामध्ये तरतूद नाही की किती वेळेत निर्णय घ्यायला हवा. राज्यपाल तो विषय अनिर्णित ठेवत आहेत. पण ते निर्णय रद्द करु शकत नाही, असे मलिक म्हणाले. १२ आमदार निवडीचा कॅबिनेटचा अधिकार आहे. न्यायालयात प्रकरण गेले आहे. अंतिम निकाल आलेला नाही. पण आता एमपीएससीचे सदस्य नेमण्याची फाईलही त्यांच्याकडे पडून आहे. त्यावर लवकरात लवकर ते हस्ताक्षर करतील अशी आमची अपेक्षा आहे, असा टोलाही नवाब यांनी राज्यपालांना लगावला.
हेही वाचा -राज्यपालांना अजूनही ते मुख्यमंत्री असल्याचा भास होतो; नवाब मलिकांचा खोचक टोला