मुंबई/पुणे - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशात गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशोत्सवावरही कोरोनाचं सावट आहे. यामुळे यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. सोबतच गणरायाच्या आगमणापासून विसर्जनापर्यंतची नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, मायानगरी मुंबई आणि गणेशोत्सवाला सुरूवात झाली त्या पुण्यात या निर्बंधांमुळे गणेश मंडळांच्या उत्साहावर विरजन पडले. सुरूवातीला तर मागील अनेक वर्षांची परपंदा यंदा खंडित होते की काय अशी भिती या मंडळांना होती. मात्र, राज्यशासनाने आखून दिलेली नियमावली फार आनंददायक नसली तरी समाधानकारक नक्कीच आहे. आता याच नियमांच्या अधीनराहून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यातील मानाच्या गणेशमंडळांनी कशापद्धतीने तयारी केली आहे, यासंदर्भातील ईटीव्ही भारताचा विशेष रिपोर्ट.
मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे देशभरातील गणेशभक्तांसाठीची पर्वणी. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत लाखोने भाविकांची गर्दी होते, परतु या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव मंडळांनी उत्सव गर्दी न करता साजरा करायचा ठरवले आहे. मुंबईत एकूण बारा हजार पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळे आहेत. प्रामुख्याने पाच, सात आणि अकरा दिवसांच्या गणपतीची येथे प्राणप्रतीष्ठापणा होते.
मुंबईतील मानाचे गणपती साध्यापद्धतीने -
मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा आणि गणेशगल्ली मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळानी यंदा या अकरा दिवसांमध्ये अनोखे उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्लाजमा दान आणि आरोग्य शिबीर घेण्याचा संकल्प लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांने केला असून शरद पवार यांच्या हस्ते या शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे. ३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आरोग्योत्सव होणार असून त्याची रूपरेषा शनिवारी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून जाहीर करण्यात आली. केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबीर होणार असून ३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळात रक्तद्रव दानाकरिता नोंदणी करता येणार आहे. याच कालावधीत गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षांत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये व शौर्यचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाविरोधातील लढाईत जनतेची सेवा करताना प्राण गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये व शौर्यचिन्हाने सन्मानित केले जाईल. तर २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात विविध आस्थापनांतील कोविडयोद्धय़ांचा सन्मान केला जाणार असून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबीर घेतले जाणार आहे.
गणेश गल्लीच्या गणपतीचा संकल्प -
मुंबईचा राजा अशी 'गणेश गल्लीच्या' गणपतीची ओळख आहे. दरवर्षी विविध रुपातील आणि भव्य गणेश मूर्ती हे मुंबईच्या राजाची विशेषत: असते. परंतु यंदा गणेशभक्तांना मंडपात हे चित्र दिसणार नाही. मुंबईच्या राजाची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांची मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गणपती मंडळामध्ये चर्चा झाली होती. याच चर्चेत कोरोनाच्या संकटामुळे मंडळाने हा निर्णय घेतला असून लहान मूर्ती आणून उत्सवाची उंची वाढवणार असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी दिली आहे. तसेच स्थानिकांसाठी सामाजिक अंतर पाळून गणपती बाप्पाच्या दर्शनाची व्यवस्था करणार असल्याची माहिती किरण तावडे यांनी दिली.