मुंबई -मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंची चौकशी करण्याची परवानगी सीबीआयला मिळाली असून लवकरच, सीबीआयकडून तळोजा कारागृहात जाऊन वाझेंची चौकशी केली जाणार आहे. यासाठी एनआयए विशेष न्यायालयाकडे सीबीआयने परवानगी मागितली होती. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला एका स्कॉर्पियोत स्फोटके सापडली होती. या स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेन याचा त्यानंतर मृतदेह आढळला होता. मनसुख हिरेन याची हत्या तपास अधिकारी सचिन वाझे यांनी केल्याचा आरोप मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केला आहे. यानंतर एनआयएकडून सचिन वाझेंना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. अनेक रेस्टॉरंट आणि बार मालक तसेच इतर ठिकाणाहून पैसे जमा करण्याचे टार्गेट देशमुखांनी वाझेंना दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. या संदर्भात चौकशीसाठी सीबीआयने NIA कोर्टात अर्ज करून परवानगी मागितली होती.
हेही वाचा -गेल्या चार वर्षात ईडी झोपली होती का? साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा हल्लाबोल