मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती आणि सर्वांत श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी यांच्या बंगल्याच्या काही अंतरावर आज (गुरुवार) सायंकाळी काळ्या रंगाची बेवारस कार आढळून आली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) या कारची सखोल तपासणी केली. यात जिलेटीनच्या 20 कांड्या आढळून आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या गाडीबाबतची सर्व माहिती तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. रात्री 1 वाजताच्या सुमारास ही कार येथे पार्क करण्यात आल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरून समोर आले आहे. तसेच त्यानंतर या कारमधील काही लोक दुसऱ्या एका कारमध्ये बसून या परिसरातून बाहेर गेल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील सर्व माहितीची तपासणी करण्यात येत आहे. एटीएस पथकाकडून घटनास्थळाची पाहणी कऱण्यात आली आहे.
हेही वाचा -विशेष: भंडारा जिल्ह्यात पैश्यांसाठी, खाण्यासाठी आणि अंधश्रद्धेपोटी वन्य प्राण्यांची शिकार
पोलिसांकडून तपास सुरू
मुंबईतील पेडर रोड परिसरातील मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ एक बेवारस गाडी आढळून आल्यामुळे आज मोठी खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून या गाडीची तपासणी करण्यात आली. यामध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्याचे समोर आले आहे. या कारच्या क्रमांकावरुन त्याच्या मालकाचा शोध घेण्यात येत आहे. त्यानंतर या प्रकरणी आणखी काही माहिती हाती येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सखोल तयार सुरु केला असून लवकरच काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अंबानींच्या घराजवळची सुरक्षा वाढवली -
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना याआधी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मात्र, आज त्यांच्या बंगल्याबाहेर वाढलेल्या संशयित कारमुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. सुरुवातील ही पोलिसांची मॉकड्रिल असल्याची अफवा पसरली होती. मात्र, प्रत्यक्षात हा घातपाताचा कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे सर्व यंत्रणांना, तसेच पोलिसांना सर्व खबरदारी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिलेटीनचा तपास क्राईम ब्रँच करणार - अनिल देशमुख