मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्धव ठाकरेंशी विस्तृत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून दिली.
पावसाळी अधिवेशना आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. येत्या सोमवारपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. रविवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल आणि नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात नेत्यांना प्राधान्य मिळत असल्याने दोन्ही पक्षांत अंतर्गत कलह सुरू झाल्याचे बोलले जाते होते, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला होता. मात्र, आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती दिल्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
'या' चेहऱ्यांना मिळणार संधी तर, 'या' नेत्यांना दाखवला जाणार बाहेरचा रस्ता -
मंत्रिमंडळ विस्तारात भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, जळगाव जिल्ह्यातील जामोद विधानसभा मतदार संघातून आमदार असलेले संजय कुटे आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरूड विधानसभा मतदार संघातून आमदार असलेले डॉ. अनिल बोंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर यांनाही मंत्रीपद मिळू शकते.
तर, राज्यमंत्री विद्या ठाकुर, कॅबीनेट मंत्री प्रकाश मेहता आणि आदिवासी कल्याण मंत्री विष्णू सवरा यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे.
'या' आयात नेत्यांना मिळणार मंत्रीपद?
भाजपमध्ये आलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रीपद दिली जाण्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे जयदत्त क्षिरसागर यांच्या गळ्यातही मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
भाजप-शिवसेनेत अंतर्गत कलह?
एकट्या भाजपतच नाही, तर मातोश्रीच्या आदेश मानणाऱ्या शिवसेनेतही अंतर्गत कलह सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर, आयात नेत्यांना मंत्रीपद दिली जात असल्याच्या शक्यतेने दोन्ही पक्षात नाराजी पसरली आहे.