महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विशेष : भायखळा जंबो कोविड सेंटर कोविड रुग्णांसाठी आशेचा किरण, हजारो रुग्णांना दिलासा - jumbo covid center

गेल्यावर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. वाढता प्रसार आणि प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयेही पालिकेने ताब्यात घेतली.

मुंबई
मुंबई

By

Published : Apr 17, 2021, 8:46 PM IST

Updated : Apr 17, 2021, 10:37 PM IST

मुंबई -कोविडचा प्रादुर्भाव वाढत असताना, मुंबई महापालिकेचे भायखळा येथील रिचर्डसन क्रुड्स कोविड सेंटर कोविड ग्रस्तांसाठी आशेचा किरण बनला आहे. मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून प्रतिदिन तीनशेहून अधिक रुग्ण येथे दाखल होत आहेत. या सर्व रुग्णांवर तत्काळ उपचार करण्याची व्यवस्था येथे उभारल्याची माहिती कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. कुमार डुसा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.


गेल्यावर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. वाढता प्रसार आणि प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयेही पालिकेने ताब्यात घेतली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ते देखील कमी पडू लागले. वरळी, बिकेसी, नेस्को, मुलुंड, दहिसर आणि भायखळ्यातील रिचर्डसन क्रुड्स येथे जंबो कोविड सेंटर उभारले होते. शेड वन आणि शेड टू असे दोन भाग केले असून महिला आणि पुरुष असे गट करण्यात आले आहेत. सुरुवातीला येथे तीनशे बेड्स होते. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता ७०० बेड्स राखीव ठेवले होते. मात्र, कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आणि येथील सर्व प्रवाशांचा क्वॉरंटाईन कालावधी संपुष्टात आल्यानंतर हा विभाग पूर्णतः रिकामा केला असून येथे १ हजार खाटांचे जंबो कोविड सेंटर तयार केले आहे. अत्यावश्यक सेवासुविधा, व्हेंटिलेटर, स्पेशालिस्ट डॉक्टर, रुग्णांना ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका, तात्काळ चाचणीसाठी यंत्रणा येथे कार्यान्वित केली आहे. मुंबईसह महामुंबई प्रदेशातून रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होत आहेत, असे कोविड सेंटरचे अधिष्टाता डॉ. कुमार डुसा यांनी सांगितले.

भायखळा जंबो कोविड सेंटर कोविड रुग्णांसाठी आशेचा किरण
३५० ऑक्सिजन बेडचे नियोजन -
कोरोनाच्या लाटेमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईत नऊ हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येचा पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. भायखळा येथील जंबो कोविड सेंटरमध्ये २५ ऑक्सिजन बेड आहेत. येथील रुग्णांना सध्या ते पुरेसे आहेत. मात्र, वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, टप्पाटप्याने त्यात वाढ करुन ३५० ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होतील, अशा प्रकारचे नियोजन आहे असे डुसा म्हणाले.
सुलभ चाचणी प्रक्रिया -
महामुंबईतील प्रत्येक घटकांतील रुग्ण रिचर्डसन क्रुड्समध्ये येत आहेत. त्यांची पुन्हा अँटिजेन आणि आरटीपीसीआर टेस्टसाठी कोविड समर्पक ओपीडी सुरू केली आहे. ज्यामुळे तत्काळ व सुलभ पध्दतीने चाचणी करणे शक्य होत आहे. तसेच रुग्णांना काही समस्या किंवा अडचणी असल्यास स्पेशालिस्ट डॉक्टरांमार्फत घरी जाऊन उपचार केले जात आहेत. अत्यावश्यक उपचारांची गरज लागल्यास नायर किंवा कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जाते, असे डॉ. डुसा यांनी सांगितले.
रिक्त जागा भरणार -


कोविड सेंटरमध्ये २५ डॉक्टर, २० नर्सेस, ३१ वॉर्डबॉय, ५ रुग्णवाहिका आणि इतर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे कर्मचारी वर्गावर ताण येत आहे. महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार लवकरच रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे डॉ. डुसा यांनी सांगितले.

प्रतिदिन ३० ते ४० पॉझिटिव्ह रुग्ण -

सध्या तीनशे रुग्ण येथे उपचार्थ दाखल आहेत. २३० पुरुष आणि ७० महिलांचा त्यात समावेश आहे. पैकी २५ रुग्णांना ऑक्सिजन बेड देण्यात आला आहेत. उर्वरित रुग्णांमध्ये लक्षणे असून त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. दिवसाला दीडशेहून अधिक जण चाचणीसाठी येतात. दरम्यान, ३० ते ४० पॉझिटिव्ह आढळून येतात. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारासाठी शेड वन, शेड टू कोविड सेंटर सुरू आहे. तेथे संबंधितांवर उपाचार केले जात आहेत, असे डॉ. पूजा नलावडे यांनी सांगितले.

Last Updated : Apr 17, 2021, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details