कोरोना इफेक्ट; गृहप्रकल्प बांधकामाला सरकारच्या परवानगीनंतरही एमएमआरमधील काम बंदच ! - संचारबंदी
देशातील 30 टक्के गृहप्रकल्पाचे काम हे एकट्या एमएमआरमध्ये आहे. चार लाखांहून अधिक घरांचा यात समावेश आहे. ही कामे बंद असल्याने बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसत आहे.
मुंबई- सरकारने आजपासून राज्यातील गृहप्रकल्पाच्या कामाला परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरासह मुंबई महानगर प्रदेशात गृहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल, असे वाटत असताना येथील कामे काही सुरू होण्याची शक्यता नाही. कारण मुंबई-एमएमआरमधील जवळजवळ सर्वच परिसर कंटोंटमेंट झोनमध्ये येत असल्याने बांधकाम करणे अशक्य ठरणार आहे.
संचारबंदी लागू झाल्यापासून बांधकाम बंद आहे. देशातील 30 टक्के गृहप्रकल्पाचे काम हे एकट्या एमएमआरमध्ये आहे. चार लाखांहून अधिक घरांचा यात समावेश आहे. ही कामे बंद असल्याने बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे संचारबंदीत कामाला परवानगी देण्याची मागणी होत होती. आता मात्र ही परवानगी मिळाली खरी, पण प्रत्यक्षात मात्र याचा कोणताही फायदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील प्रकल्पाना मिळणार नाही. कारण एमएमआरमधील जवळ जवळ सर्वच परिसर कंटोंटमेंट झोनमध्ये आहेत. त्यामुळे येथे कुठल्याही प्रकारचे काम करता येणार नसल्याची माहिती बांधकाम तज्ज्ञ अनुज पुरी यांनी दिली आहे.
कंटेन्टमेंट झोन कोरोनामुक्त झाल्यानंतरच येथे बिल्डरांना काम करता येणार आहे. तेव्हा या परवानगीचा फायदा होणार नसल्याने आणि आर्थिक नुकसान वाढत जाणार असल्याने बिल्डरांची चिंता वाढली आहे.