मुंबई -महाविकास आघाडी सरकारमधील ( Maharashtra Mahavikas Aghadi Government ) नेत्यांच्या मागे ईडी, तसेच केंद्रीय तपास यंत्रणा लावल्या आहेत. मात्र, या सर्वांच्या मागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी ( Minister Nawab Malik Criticise Devendra Fadnavis ) केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नबाव मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी राज्य सरकार पडणार नाही. पण, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्राचे सरकार आम्ही ताब्यात घेऊ. महाविकास आघाडी सरकारच्या मागे ईडी, केंद्रीय तपास यंत्रणा लावण्याचे कट-कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र, तेव्हापासूनच हे सरकार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले. यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारचे नेते घाबरणार नाहीत, असा इशाराही पुन्हा एकदा नवाब मलिक त्यांच्याकडून देण्यात आला आहे.