मुंबई - कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये केलेली शिथिलता आणि मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारी गर्दी, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणून गणेशोत्सवात सर्व नागरिकांनी शिस्तीचं पालन करत अत्यंत साध्या पद्धतीने सण साजरा करावा, असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. नेमून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अन्यथा साथरोग कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे.
गर्दी टाळा, कोरोनाचा प्रसार रोखा -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या दीड वर्षात मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. केरळ आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढू लागल्याने केंद्र सरकारने सणांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून निर्बंध लादण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने सर्व सण-उत्सव साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन नागरिकांना केले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नियमावली जाहीर केली आहे.
- घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत-जास्त ५ व्यक्तींचा समूह असावा. शक्यतोवर या व्यक्तींनी ‘कोविड-१९’ या रोगाच्या लसीकरणाचे 2 डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. श्री गणेशाची मूर्ती ही घरगुती उत्सवासाठी 2 फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.
- सार्वजनिक गणेशमूर्तींच्या आगमनाच्यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील ते मास्क वापरतील आणि सामाजिक अंतर पाळतील. तसेच शक्यतो सदर 10 व्यक्तींनी ‘कोविड-१९’ या रोगाच्या लसीकरणाचे 2 डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. श्री गणेशाची मूर्ती ही सार्वजनिक उत्सवासाठी 4 फूटापेक्षा जास्त उंचीची नसावी. आगमनासाठी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येवू नये.
- घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे, कुटुंबीयांचे कोविड-19 साथरोगापासून रक्षण करणे शक्य होईल.
- भाविकांना प्रत्यक्षदर्शन / मुखदर्शन घेण्यास सक्त मनाई आहे. गणेशोत्सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्यमे इत्यादीद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हार / फुले इत्यादीचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल याची दक्षता घ्यावी.
- घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे.
- गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे.
- घरगुती गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त 5 व्यक्ती असाव्यात. शक्यतोवर या व्यक्तींनी ‘कोविड-19’ या रोगाच्या लसीकरणाचे 2 डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत.
- घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेवू नयेत.
- विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्क / शिल्ड इत्यादी स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरण्यात यावी.
- शक्यतोवर लहान मुलांनी व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.
- सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील त्यांनी मास्क वापरावे आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच सदर 10 व्यक्तींनी शक्यतो ‘कोविड-19’ या रोगाच्या लसीकरणाचे 2 डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. तसेच, कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येवू नये.
- सार्वजनिक गणशोत्सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्यंत धीम्या गतीने नेवू नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही, अशा सामान्य गतीने वाहन विसर्जन स्थळी घेवून जावे. विसर्जनादरम्यान वाहन थांबवून रस्त्यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेवू देण्यास / पूजा करुन देण्यास सक्त मनाई आहे.
- गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्यावी.
- मुंबई शहरात एकूण 73 नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. तेथे महापालिकेद्वारे अतिरिक्त मनुष्यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्तबद्ध व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यांच्याकडे गणेशमूर्ती देण्यात यावी. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे.
- नैसर्गिक विसर्जन स्थळांवरील गर्दी कमी होण्यासाठी महानगरपालिकेच्या 24 विभागांमध्ये सुमारे 173 ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱया भाविकांनी शक्यतोवर सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा.
- महापालिकेच्या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.
- मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर उपलब्ध महापालिकेच्या व्यवस्थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.
- विसर्जनादरम्यान सामाजिक दूरीकरण अंतर , मास्क, सॅनिटायझर वापरणे इत्यादी संबंधीत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्ये असणाऱया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सील इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी घरीच व्यवस्था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
- घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.
- बृहन्मुंबई महानगरपालिका / पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा 1897, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 व भादवि 1860 कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.
हेही वाचा -गणेशाला १२ नाव का आहेत?, पहा ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट