मुंबई -गोरेगाव खंडणी प्रकरणात विमल अग्रवाल यांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी रियाज भाटी अद्याप फरार असून, त्याच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. आज या अर्जावर सुनावणी करत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे, रियाज भाटीच्या अडचणी वाढल्या आहेत.
हेही वाचा -Mumbai CP Meet Sharad Pawar : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतली शरद पवारांची भेट
विमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंग ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांचे नाव आहे. गोरेगाव पोलीस ठाण्याने चौकशीकरिता परमबीर सिंग यांना वारंवार समन्स देऊन सुद्धा ते चौकशीला हजर झाले नव्हते. त्यानंतर परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले होते. त्यानंतर परमबीर सिंग गोरेगाव पोलीस स्थानकात जाऊन चौकशीला सामोरे गेले होते. या प्रकरणात गोरेगाव पोलिसांनी आरोपपत्र किल्ला कोर्टात दाखल केले आहे.