मुंबई - महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुणे शहरासह राज्याला हादरवून टाकणारी बीपीओ महिला कर्मचाऱ्याची खून व बलात्काराची घटना २००७ ला घडली होती. या प्रकरणामधील दोन्ही आरोपींच्या फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.
आरोपीला शिक्षा देण्याच्या अंमलबजावणीत प्रदीर्घ वेळ लागल्याने न्यायालयाने शिक्षा रद्द केली आहे. पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकाटे अशी दोषींची नावे आहेत.
काय खून व बलात्कार प्रकरण-
आरोपींनी बीपीओमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षी महिलेवर बलात्कार करून तिचा खून केला होता. दोघे आरोपी बीपीओ कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या वाहनांवर चालक म्हणून काम करत होते. पीडिता ही बहीण व नातेवाईकासोबत पुण्यात राहत होती.
१ नोव्हेंबर २००७ पासून पीडित तरुणी बेपत्ता झाली होती. तिच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली. तेव्हा पीडितेचा मृतदेह सापडला होता. आरोपींचा खटला लढविणाऱ्या वकिलाकडे वकिलाची सनद नसल्याचेही तेव्हा आढळून आले होते. आरोपींनी पीडितेचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. विशेष म्हणजे खून झाल्यादिवशी तिच्या कामाचा शेवटचा दिवस होता. या खूनामुळे बीपीओ कर्मचाऱ्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.