मुंबई - शहरात अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्या आहेत. यापैकी अनेक जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. या जुन्या ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्याचे (आर्च ड्रेन) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळकटीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर कोणतेही खोदकाम न करता चरविरहित तंत्रज्ञान या कामासाठी वापरले जाणार आहे. या कामासाठी पालिका १०२ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
पर्जन्य जलवाहिन्यांची सुधारणा -
मुंबईत ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांचे मोठे जाळे आहे. मुंबईचा विकास झपाट्याने होत असल्याने पायाभूत सुविधांचा ताण शहरांवर आला आहे. लोकसंख्याही वाढत असल्याने रस्ते, पाणी, मलनि:सारण आणि पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या १५ -१६ वर्षात ब्रिमस्टोवॅड प्रकल्पात पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता वाढवले जाते आहे. या बरोबर ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे सुधारून त्याचे आयुर्मान वाढवण्यात येणार आहे. शहर भागात कुलाबा ते सायनदरम्यान २२ ठिकाणी हे काम केले जाणार आहे. ड्रेनची बहुसंख्य बांधकामे विटांची आहेत. काही बांधकामे आतून खचण्याची शक्यता असते. आतील भिंतींचे प्लास्टर निखळलेले असते. त्यामुळे त्याचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात या ड्रेनमधून पाण्याचा मोठा प्रवाह असतो. ड्रेन कमकुवत झाल्यास पाणी भूगर्भात शिरण्याची किंवा इतर मार्गाने बाहेर येण्याची भीती असते. हे लक्षात घेऊन या कामाव्दारे उपाययोजना केल्या जाणार आहेत. अशी माहिती पालिकेच्या पर्जन्यजलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्याने दिली.