मुंबई -केंद्रीय मंत्रीनारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी महानगरपालिका कर्मचारी अनधिकृत घराची पाहणी करण्यासाठी आले. या पथकामध्ये पालिकेचे आठ अधिकारी आहेत. यावेळी हे अधिकारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चाही करणार आहेत. काही अनियमितता आढळल्यास कारवाईबाबत निर्णय होणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे. दुपारी हे पथक बाहेर पडले मात्र आत काय झाले ते समजू शकले नाही.
संबंधित कागदपत्रांची तपासणी
माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी (दि. 18 फेब्रुवारी)रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली. तसेच पथकाने बंगल्यातील बांधकामांचे मोजमाप घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणीही केल्याची माहिती समोर आली होती.
परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष सुरू आहे. परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याबद्दल नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर उभयतांमधील वाद आणखी चिघळला आहे. आता शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने राणे यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली. त्यावरूनही चांगलेच राजकारण तापले आहे.