मुंबई-मुंबई महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे हा सण अत्यंत साधे पणाने साजरा केला जात आहे. रविवारी दीड दिवसाचे, त्यानंतर पाच, सात आणि अकरा दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. भाविकांना गणेश मूर्ती विसर्जन करता यावे म्हणून पालिकेने समुद्र किनाऱ्यावर ७० ठिकाणी तसेच १६८ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत. या विसर्जनाच्या ठिकाणी पालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
मुंबई महापालिका गणेश विसर्जनासाठी सज्ज गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार भारतातही झाला असून मुंबई त्याचा हॉटस्पॉट बनली आहे. यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका व शासनस्तरावरुन वेळोवेळी नागरिकांना करण्यात आले आहे. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा-'वर्षा'वर कुटुंबीयांसमवेत मुख्यमंत्र्यांनी केली श्री गणेशाची प्रतिष्ठापना
मुंबई शहरात एकूण ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जावून मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर महापालिकेद्वारे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. याठिकाणी मूर्ती संकलनाची शिस्तबद्ध व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर उपलब्ध महापालिकेच्या व्यवस्थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्यापूर्वी मूर्तीची पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे. कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्राची माहिती गुगल लोकेशनसह महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
कृत्रिम तलाव -
नैसर्गिक विसर्जन स्थळांवरील गर्दी कमी होण्यासाठी महापालिकेच्या २४ विभागांमध्ये सुमारे १६८ कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्थळांवर जाण्यास मनाई असल्याने सदर कृत्रिम तलावाचा वापर लगतच्या भाविकांनी करणे बंधनकारक आहे.
गणेशमूर्ती संकलन केंद्रे -
महापालिकेच्या प्रत्येक विभागांतर्गत ७ ते ८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. महापालिकेने विशेष व्यवस्था म्हणून ट्रकवर टाक्या किंवा इतर व्यवस्था करुन फिरती विसर्जन स्थळे निर्माण केलेली आहेत, त्याचाही लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे.
कंटेनमेंट झोनमधील विसर्जन -
ज्या विभागात कोरोना रुग्ण आढळून आला आहे तो विभाग किंवा इमारत सील केली जाते. या विभाग किंवा इमारतीमधील भाविकांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेंनमेंट झोन मध्ये असणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे.
मिरवणूक नाही, नियम पाळा -
गणेशोत्सवा दरम्यान कोणत्याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्यावी. विसर्जना दरम्यान सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर वापरणे इत्यादी आरोग्य संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.