मुंबई -मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे ( BMC Survey Narayan Rane House ) यांच्या जुहू येथील अधीश बंगल्याची तपासणी केली होती. त्यात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे स्पष्ट झाल्याने पालिकेने नारायण राणे ( BMC Notice To Narayan Rane ) यांना नोटीस बजावली आहे. बेकायदेशीर बांधकाम स्वता तोडावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा पालिकेने राणे यांना नोटीसद्वारे दिला आहे.
राणेंच्या बंगल्याला पालिकेची नोटीस -
मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम वॉर्ड (अंधेरी पश्चिम)च्या पदसिद्ध अधिकाऱ्याने मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 488 अन्वये मालक कब्जेदाराला म्हणजेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिली होती. के -पश्चिम प्रभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक 18 फेब्रुवारी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी कर्मचार्यांसह आवारात किंवा CTS क्रमांक 997 आणि 997-A मध्ये प्रवेश करून मोजमाप व छायाचित्रे घेईल. त्यावेळी बंगल्याचे बांधकामावेळचे मंजूर करण्यात आलेले प्लान, बंगल्याच्या बांधकामाबाबतची कागदपत्रे तयार ठेवण्यात यावीत, अशी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणे यांच्या बंगल्यात जाऊन मोजमाप घेतले होते. तसेच कागदपत्रे तपासली होती. त्यानंतर एक अहवाल तयार करून राणे यांनी बेकायदेशीर बांधकाम केले असल्यास पुन्हा नोटीस पाठवली जाईल, असे सांगण्यात आले होते.