महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर..! बीएमसीची २९ मॉलना कारणे दाखवा नोटीस; कायदेशीर कारवाईही होणार - मुंबई अग्निशामक दल

मुंबई शहरातील मोठ मोठ्या मॉल आणि इमारतींना आग लागण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंट्रल मॉलला आग लागल्यानंतर शहरातील तब्बल ७६ मॉलची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील काही मॉलवर कारवाई कऱण्याचे संकेत महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर
अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर

By

Published : Nov 19, 2020, 7:26 PM IST

मुंबई - मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या भीषण आगीनंतर मुंबईतील सर्व मॉलची तपासणी करण्याचे निर्देश स्थायी समितीने दिले होते. त्या अनुषंगाने मुंबईतील ७६ मॉलमधील अग्निसुरक्षेची तपासणी करण्यात आली. तसेच आग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या २९ मॉलना मुंबई महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मॉलमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा तातडीने कार्यान्वित करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

चौकशीची मागणी -

सिटी सेंटर मॉलला २२ ऑक्टोबरला लागलेली आग नियंत्रणास येण्यास तब्बल ५६ तास लागले होते. या ठिकाणी बंद असलेली अग्निशमन यंत्रणा आणि बेकायदा बांधकाम यामुळे आग भडकली, त्यामुळे आग विझवण्यास उशीर झाला. यामुळे मॉलमधील अग्निसुरक्षा यंत्रणा व बेकायदा बांधकाम याची चौकशी करावी. तसेच या मॉलला भेट देऊन अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वयीत असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या अग्नी सुरक्षा पालन अधिकारी, सहाय्यक आयुक्त व पथ निर्देशित अधिकारी यांची चौकशी अतिरिक्त आयुक्तांमार्फत करण्याची मागणी स्थायी समितीत करण्यात आली होती. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मुंबईतील सर्व मॉलमधील आग्निसुरक्षेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते.

२९ मॉलमध्ये अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष -

पालिकेच्या अग्निशमन दलाकडून मॉलची तपासणी करण्यात आली असून २९ मॉलमध्ये अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष आणि त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नोटीस बजावण्यात आल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली. मॉलमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम किंवा बेकायदेशीर काम केले जात असल्यास संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असेही शशिकांत काळे यांनी स्पष्ट केले.

तर परवाना रद्द -

२९ माॅल्स मध्ये अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांसह काही त्रुटी आढळून आल्या. या २९ माॅल्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एक महिन्याच्या आत त्रुटी दूर न केल्यास परवाना रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा माॅल्स धारकांना दिल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

या मॉलना बजावली नोटीस -

१) सीआर २ मॉल, नरिमन पॉईंट, २) सिटी सेंटर मॉल नागपाडा, ३) नक्षत्र मॉल दादर, ४) डी.बी. मॉल जुहू, ५) रिलायन्स रिटेल लि. सांताक्रूूझ, ६) मिलन मॉल सांताक्रूझ (प.), ७) केनी वर्थ शॉपिंग सेंटर खार, ८) ग्लोबल प्रा.लि. वांद्रे, ९) सुब्रिया मॉल वांद्रे, १०) टिंथ सेंटर मॉल कांदिवली ११) गोकूळ शॉपिंग सेंटर बोरिवली, १२) देवराज मॉल बिल्डिंग दहिसर, १३) रिलायन्स मॉल बोरिवली, १४) सेंटर प्लाझा मॉल मालाड, १५) के. स्टार मॉल चेंबूर, १६) ठाकूर मुव्ही अँड शॉपिंग सेंटर कांदिवली, १७) अँनेक्स मॉल कम थिएटर कांदिवली, १८) क्युबिक मॉल चेंबूर, १९) द मॉल मालाड, २०) हायको मॉल बिल्डिंग पवई, २१) ड्रीम मॉल भांडूप, २२) विष्णू शिवम मॉल कांदिवली, २३) साई कृपा मॉल दहिसर, २४) इस्टन प्लाझा मॉल मालाड, २५) हाय लाईफ प्रिमाईसीस सांताक्रूझ, २६) द झोन मॉल बोरिवली, २७) गारुर अँड वेल इंडिया लिमिटेड कांदिवली, २८) गोकुळ शॉपिंग आर्किडीया बोरिवली, २९) रिलायन्स मॉल वांद्रे

ABOUT THE AUTHOR

...view details