मुंबई - मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या तब्बल 508 झाडे तोडण्याची मागणी करण्यात आली आहे. ही झाडे तोडण्यासाठीचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे सादर करण्यात आला आहे. या आधीही कारशेडसाठी आरेमधील 2200 झाडे तोडल्याने त्याचे पडसाद सर्वत्र उमटले होते.
आता या प्रस्तावावर सत्ताधारी शिवसेना काय भूमिका घेते याकडे वृक्षप्रेमींचे लक्ष लागले आहे.
भाजप-शिवसेना युतीच्या काळात आरे येथील मेट्रो कारशेडसाठी झाडे कापण्यावरून जोरदार वाद रंगला होता. त्यावेळी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह विरोधक आणि वृक्षप्रेमी संस्था आक्रमक झाल्या. काही संस्थांनी निदर्शनेही केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर झाडे कापण्यास स्थगिती देण्यात आली. आता पुन्हा मेट्रो प्रकल्पासाठी 508 झाडे हटवण्याचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. यामध्ये 162 झाडे मुळापासून कापली जाणार आहे. तर 364 झाडे पुनर्रोपणाच्या नावाखाली हटवण्यात येणार आहेत.
वृक्ष प्राधिकरण समिती मधील इतर सदस्यांनी वृक्ष तोडीच्या बाजूने मतदान केल्याने हा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यामुळे 2200 झाडे तोडण्यास मंजुरी मिळाली होती. आता पुन्हा मेट्रोसाठी झाडे तोडण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले असून शिवसेना कायम वृक्षतोडीचा विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.