मुंबई- मुंबई महापालिका निवडणूक ( BMC Election ) तोंडावर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय मतदार याद्यांचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईमध्ये मागील पाच वर्षात तब्बल सात लाख 12 हजार 925 नवीन मतदार वाढले आहेत. या मतदार याद्यांवर नागरिकांना 1 जुलैपर्यंत हरकती, सूचना मांडता येणार आहे. त्यानंतर 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
तर संपर्क साधा -भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे, 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या महापालिका निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदार याद्यांचे विभाजन करताना मतदाराचा चुकून प्रभाग बदलला असेल किंवा यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसेल अशा चुका झाल्या असतील तर त्याची दुरूस्ती करून यादीत अंतर्भाव केला जाणार आहे. यासाठी नागरिकांनी पालिकेच्या विभाग निवडणूक कार्यालयात तसेत बाहेरगावी असलेल्यांनी इमेलवर संपर्क करावा, असे आवाहन संजीव कुमार यांनी केले आहे.