महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा! संपूर्ण मुंबईत होणार अँटीजन चाचणी - अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी न्यूज

सध्या, रोज 5 ते 6 हजार कोरोना चाचणी होतात. मुंबईभर अँटीजन चाचणी सुरू झाल्यास हा आकडा आणखी वाढणार आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यास मदत होईल, असे बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jul 11, 2020, 6:40 PM IST

मुंबई - कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण मुंबईत अँटीजनपद्धतीने कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. पालिकेकडे चाचणीचे 1 लाख किट आहेत. त्याचे वाटप करून येत्या 2 ते 3 दिवसांत मुंबईभर अँटीजन चाचणीला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

अँटीजनमुळे मुंबईतील कोरोना चाचणीचे प्रमाण वाढले आहे. सध्या, रोज 5 ते 6 हजार कोरोना चाचणी होतात. मुंबईभर अँटीजन चाचणी सुरू झाल्यास हा आकडा आणखी वाढणार आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यास मदत होईल, असेही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.


कमी वेळेत निदान झाल्याने मृत्यूदर नियंत्रणात येण्याची शक्यता
आरटी पीसीआर पद्धतीने मुंबईत कोरोना चाचणी होते. गेल्या आठवड्यापासून त्याच्या जोडीला अँटीजन चाचणीही सुरू झाली आहे. जुन्या पद्धतीने कोरोना चाचणीचा अहवाल मिळायला 24 ते 48 तास लागतात. तर नव्या अँटीजन पद्धतीत केवळ अर्ध्या तासात अहवाल येत आहे. त्यामुळे निदान लवकर होऊन कोरोनापॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार वेळेत करणे शक्य होऊ लागले आहे. तर महत्त्वाचे म्हणजे गंभीर रूग्ण कमी होऊन मृत्युदर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

उत्तर मुंबईपासून चाचणीला सुरुवात-

उत्तर मुंबई हा कोरोनाचा सध्याचा हॉटस्पॉट आहे. त्यामुळे या परिसरातच आधी अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेत 10 हजार किटचे वाटप करण्यात आले. त्यानुसार अँटीजन चाचणीला सुरुवात झाल्यापासून आठवड्याभरात 3 हजार 500 चाचण्या झाल्या आहेत. तर यातील 9.50 टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आल्याची माहिती काकाणी यांनी दिला. तर 340 पॉझिटिव्ह रुग्ण अँटीजन चाचणीद्वारे आढळले आहेत. शुक्रवारी मुंबईत 5 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर आज (शनिवारी) 5 हजार 900 चाचण्या होत असल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.


मुंबईत अँटीजन टेस्ट राबवणे सहज शक्य-
दरम्यान, उत्तर मुंबईपुरती मर्यादित असलेली अँटीजन टेस्ट संपूर्ण मुंबईत येत्या 2 ते 3 दिवसात सुरू करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नसल्याने मुंबईतील कोणत्याही पालिका रुग्णालयात जाऊन लक्षणे असलेल्या नागरिकाला चाचणी करणे सोपे होणार आहे. उपलब्ध असलेल्या 1 लाख अँटीजन किटपैकी 3 हजार 500 किटचा वापर झाला आहे. अजूनही मोठ्या संख्येने किट उपलब्ध असल्याने मुंबईत अँटीजन टेस्ट राबवणे सहज शक्य होणार आहे. तर जोडीला आरटी पीसीआर पध्दतीने चाचणी घेण्यात येणार आहे.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणीचे आव्हान मुंबई महापालिकेला पेलावे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details