मुंबई – महामारी नियंत्रणात आणण्यासाठी धडपडणाऱ्या मुंबईच्या एच पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे आज कोरोनाने निधन झाले. मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अखेर त्यांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज संपली. कोरोनाच्या काळात त्यांनी अत्यंत उल्लेखनीय काम केल्याने कोरोना नियंत्रणात आणण्यात त्यांचा एच पूर्व विभाग पहिल्या क्रमांकावर होता.
अशोक खैरनार हे गेली काही वर्षे पालिकेत सहायक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. ते एक कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जात होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर एच पूर्व (वांद्रे ते सांताक्रूज) क्षेत्राबाबत मोठी चर्चा रंगली होती. पण खैरनार यांनी टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करत कलानगरच नव्हे तर संपूर्ण एच पूर्व विभागातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणला.
त्यांच्या कामामुळेच एच पूर्व कोरोना नियंत्रणात आणणारा मुंबईतील पहिल्या क्रमांकाचा विभाग ठरला. त्यांना कॊरोना झाल्याने सोमवारी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची तब्येत खालावल्याने शुक्रवारी त्यांना फोर्टिसमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. तर रेमडेसीवीर इंजेक्शनही देण्यात आले. पण आज दुपारी अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनाने निधन - Mumbai H East corona news
अशोक खैरनार हे गेली काही वर्षे पालिकेत सहायक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. ते एक कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
प्रतिकात्मक
दरम्यान, देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने संपूर्ण मुंबईत अँटीजेन चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर रेमेडेसीवीरची आणखी 15 हजार इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.