महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवजात बालक मृत्यू प्रकरण - बालकांचा मृत्यू इन्फेक्शनमुळे, पडसादानंतर पालिकेची चौकशी समिती नियुक्त - बालक मृत्यू भांडूप

भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात ४ बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई महापालिकेत तसेच, विधिमंडळात पडसाद उमटल्यावर पालिकेने चौकशी समिती नियुक्त केली आहे. सायन रुग्णालयातील बालरोग विभागातील तज्ञांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त केली आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

inquiry committee babies death bhandup
बालक मृत्यू भांडूप

By

Published : Dec 23, 2021, 9:24 PM IST

मुंबई - भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात ४ बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई महापालिकेत तसेच, विधिमंडळात पडसाद उमटल्यावर पालिकेने चौकशी समिती नियुक्त केली आहे. सायन रुग्णालयातील बालरोग विभागातील तज्ञांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त केली आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, औषधांना प्रतिसाद न देणारी सात बालके या प्रसुतिगृहात दाखल झाली असून, त्यापैकी ४ जणांच्या मृत्यूनंतर ३ बालकांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा -Covid Patients Increased Mumbai : मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, नव्याने 602 रुग्णांची नोंद

इन्फेक्शनमुळे बालकांचा मृत्यू -

पालिका प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्टला भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहात एनआयसीयू सुरू करण्यात आला. हा एनआयसीयू इंडियन पेडियाट्रिक या खासगी संस्थेला चालवायला दिला आहे. या एनआयसीयूमध्ये सध्या १५ बालके दाखल आहेत. त्यापैकी ७ ( १ मुलगी, ६ मुले ) बालकांचे वजन कमी असणे, गर्भामध्ये वाढ वेळेवर न होणे, डायरिया इतर गंभीर आजार असणे, अशा विविध आजारांमुळे भरती झाली होती. या बालकांवर कोणत्याही प्रकारच्या औषधांचा परिणाम होत नाही, अशा प्रकारचे त्यांना इन्फेक्शन झाले होते. या ७ बालकांपैकी २० ते २३ डिसेंबर दरम्यान ४ बालकांचा मृत्यू झाला आहे. मुलुंड, मालाड, ओशिवरा, चिताकॅम्प या ठिकाणच्या मॅटर्निटी होममध्ये जन्म घेतेलेली ही बालके नंतर प्रसुतिगृहात भरती करण्यात आली होती. इतर २ बालकांची प्रकृती चांगली आहे. तर, १ बालक व्हेंटिलेटर असले तरी त्याचीही प्रकृती स्थिर आहे. प्रसुतिगृहात मृत्यू झालेल्या ४ बालकांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सायन रुग्णालयातील बालरोग विभागातील तज्ञांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. एनआयसीयूमधील जमीन तसेच, इतर यंत्रांवरील नमुने घेण्यात आले असून त्याची तपासणी केली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या एनआयसीयूमध्ये आतापर्यंत मृत्युदर ५ ते ६ टक्के होता. मात्र, आता या ४ बालकांच्या मृत्यूमुळे मृत्युदर ७ टक्के झाला आहे. इतर एनआयसीयूमध्ये मृत्यूदर १० टक्के असतो, असेही आरोग्य विभागाने सांगितले.

खासगी संस्थाना विरोध -

भांडुप येथील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज पालिकेत उमटले. भाजपच्या नगरसेवकांनी या प्रकरणी सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध करत महापौर कार्यालयाबाहेर निदर्शने केली. तर, या घटनेप्रकरणी प्रशासनाचा निषेध करत आरोग्य समितीची बैठक तहकूब करण्यात आली. पालिका रुग्णालयात सुरू असलेला एनआयसीयू पालिका चालवत नाही. तो खासगी संस्थेला चालवण्यास दिला आहे. पालिका रुग्णालयातील आयसीयू, एनआयसीयू खासगी संस्थेला चालवायला देऊ नये, अशी मी मागणी गेले कित्तेक वर्षे करत आहे. खासगी संस्थांना आयसीयू, एनआयसीयू चालवायला दिल्याने त्यांनी काही चुका केल्यास किंवा योग्य उपचार न केल्यास पालिकेचे नाव खराब होते. तसेच, अशा काही घटना घडल्यास त्याला पालिकेला जबाबदार धरले जाते. यामुळे खासगी संस्थांना आयसीयू, एनआयसीयू चालवायला देऊ नये. बालकांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेतील आरोग्य समितीच्या अध्यक्ष राजुल पटेल यांनी दिली.

घटनेचे पडसाद -

मुंबई महानगरपालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामध्ये एनआयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या पालकांना कळविण्यात आले होते. रुग्णालयात आणखी तीन बाळ आहेत त्यांनाही असेच इन्फेक्शन झाल्याचे समजते. भांडुप येथील महानगरपालिका सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसुतिगृहामध्ये चार दिवसांत चार बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद आज विधिमंडळात आणि महापालिका मुख्यालयात उमटले. या प्रकरणी विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर सरकारने या प्रकरणाशी संबंधित अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर, भाजप नगरसेवकांनी महापौर कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -

रुग्णालयातील नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षामधील चार बालकांचा (Septic Shock- Infection) सेफ्टीक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. रुग्णालयातील एनआयसीयू ( नवजात शिशू अतिदक्षता विभाग ) हा महापालिका चालवत नसून त्याचे कंत्राट खासगी वैद्यकीय संस्थेस दिले आहे. या संस्थेबाबत स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी आणि जागृती पाटील यांनी वारंवार तक्रार करून आरोग्य समितीत आवाज उठवल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेने व रुग्णालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरवर्षी साडेचार हजार कोटी आरोग्य यंत्रणेवर खर्च केल्यानंतरही मुंबईकरांच्या नशिबी असे दुर्दैवी मृत्यू असतील तर, पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर कोणी विश्वास ठेवण्यास धजावेल का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे गटनेते शिंदे यांनी उपस्थित केला. याप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापन खासगी संस्थेकडून काढून घेऊन सदर खासगी संस्थेचा वैद्यकीय परवाना आणि नोंदणी रद्द करावी. तसेच, या नवजात अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि खासगी संस्थाचालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.

हेही वाचा -MH Assembly Winter Session 2021 : आदित्य ठाकरे धमकी प्रकरणी एसआयटी स्थापन करणार - गृहमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details