तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेले बीकेसी कोविड सेंटर सुरू होण्याची प्रतीक्षा - बीकेसी कोविड सेंटर
'तौक्ते' चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता 15 मे पासून बीकेसी कोविड सेंटर बंद करण्यात आले होते, तर येथील 250 हुन अधिक रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले होते. त्याचवेळी हे सेंटर 1 जूनला पुन्हा रुग्णसेवेत दाखल होईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आज 1 जून उजाडली आहे, पण हे सेंटर काही अजून सुरू झाले नाही.
मुंबई - 'तौक्ते' चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता 15 मे पासून बीकेसी कोविड सेंटर बंद करण्यात आले होते, तर येथील 250 हुन अधिक रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले होते. त्याचवेळी हे सेंटर 1 जूनला पुन्हा रुग्णसेवेत दाखल होईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आज 1 जून उजाडली आहे, पण हे सेंटर काही अजून सुरू झाले नाही. मुंबई महानगर पालिकेकडून अजून कोणतेही निर्देश न आल्याने सेंटर सुरू झाले नसल्याचे समजते आहे. तर येत्या दोन दिवसात सेंटर सुरू होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत अंदाजे 22 हजार रुग्ण बरे -
गेल्या वर्षी कोरोना रुग्णवाढ झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडू लागल्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बीकेसीत कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. कोविड सेंटर उभारण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) वर टाकली. त्यानुसार काही दिवसात काम पूर्ण करत एमएमआरडीएने हे सेंटर पालिकेकडे हस्तांतरीत केले. जूनमध्ये येथे रुग्णांवर उपचार सुरू झाले. जून 2020 ते 15 मे 2021 पर्यंत या सेंटरमधून अंदाजे 22 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचवेळी येथे मुंबईतले सर्वात मोठे लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. तर देशातील सर्वाधिक लसीकरण या केंद्रावर झाले आहे. त्यामुळे या कोविड सेंटरची कॊरोना नियंत्रणात महत्वाची भूमिका मानली जात आहे.
लवकरच केंद्र सुरू होणार -
बीकेसी कोविड सेंटर हे सखल भागात असून हे ट्रँझिट हॉस्पिटल आहे. त्यामुळे चक्रीवादळात या सेंटरला फटका बसण्याची शक्यता अधिक असते. तसा थोडाफार फटका गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळादरम्यान बसला होता. तर मोठ्या पावसाळ्यात पाणीही साचते. या पार्श्वभूमीवर 15 मे ला तौक्ते वादळाचा इशारा मिळाल्याबरोबर रात्री उशिरा येथील रुग्णांना इतर रुग्णालयात हलवले. तेव्हापासून हे सेंटर बंद होते. वादळात काही नुकसान झाले होते. तेव्हा डागडुजी करत 1 जूनला सेंटर सुरू होईल असे पालिकेने जाहीर केले होते. पण अजुन हे सेंटर सुरू झालेले नाही. याविषयी डॉ. राजेश डेरे यांना विचारले असता त्यांनी सेंटरची डागडुजी झालेली आहे. आम्ही रुग्ण दाखल करून घेण्यासाठी सज्ज आहोत. आता फक्त पालिकेकडून निर्देश येणे बाकी आहे. एक-दोन दिवसात निर्देश येतील अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले आहे.