मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडी, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या सगळ्या गोष्टींवर आज (गुरूवारी) भाजपची राज्य कार्यकारणीची बैठक होत आहे. या बैठकीत सरकार विरोधात ठराव मांडण्यात आला. सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. या कार्यकारणीमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यभरातील जवळपास 1400 कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आमदार, माजी मंत्री आदी भाजपचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही कार्यकारणीची बैठक ऑनलाईन पद्धतीने झाली.
'सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं आहे का?'
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात भाष्य करताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. 'महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे सांगत आहेत की, केंद्र सरकारने इंपरीकल डाटा द्यावा, परंतु 2010 साली काँग्रेसच्या काळात जनगणना झालेली आहे. ती जातिनिहाय जनगणना झालेली नसल्यामुळे हा डाटा महाराष्ट्र सरकारलाच तयार करावा लागणार आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी आपले हात झटकू नये', असे ते म्हणाले. तसेच या सरकारला मुळातच ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं आहे का? असा सवाल देखील या वेळेस भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ देणार नाही, असे वक्तव्य मदत व पुनर्वसन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले होते, परंतु चार-पाच दिवसातच जिल्हा व तालुक्याच्या निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा ते कुठे गेले होते. असा प्रश्नही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.