महाराष्ट्र

maharashtra

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष- देवेंद्र फडणवीस

राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत.

By

Published : Jan 18, 2021, 8:22 PM IST

Published : Jan 18, 2021, 8:22 PM IST

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मुंबई -राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. इतर तिन्ही पक्षांपेक्षा भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस

जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला-

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले "या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. व एकंदरीत जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवलेला आहे. याकरता मी जनतेचे आभार मानतो व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. या सरकारने शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदार यांच्यावर अन्यायच केलेला आहे. एकीकडे मोदी सरकार कोरोना काळात, लाॅकडाऊन मध्ये जनतेच्या पाठीशी उभा राहिलेला असताना राज्य सरकारने जनतेला एक फूटी कवडी सुद्धा दिली नाही. हा सर्व रोष जनतेने मतमोजणीतून दाखवून दिलेला आहे. इतर तिन्ही पक्षांपेक्षा भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे."

भाजपाला 1907 ग्रामपंचायतींमध्ये बहुमत-

सोमवारी सायंकाळपर्यंत जाहीर झालेले निकाल व मतमोजणी सुरु असलेल्या ठिकाणांचे कल पाहता भारतीय जनता पार्टीला 14 हजारांपैकी 6 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळेल, असा अंदाज आहे. सोमवारी जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपाला 1907 ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळाले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, राधाकृष्ण विखे-पाटील आदी नेत्यांच्या मतदारसंघात भाजपाला मोठे यश मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यातील 743 पैकी 372 ग्रामपंचायतींत भाजपाने यश मिळवले.

माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लॉकडाऊन काळात राज्य सरकारने शेतकरी, शेतमजूर आदी समाजघटकांना एका पैशाचीही मदत केली नाही. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनाही राज्य सरकारने मदत दिली नाही. सरपंचांची थेट निवड पद्धत रद्द केली. अशा अनेक कारणांमुळे जनतेच्या मनात असलेला राग या निवडणुकीतून व्यक्त झाला. तसेच केंद्र सरकारने सर्व समाज घटकांसाठी घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयावर जनतेने पसंतीची मोहोर उमटवली आहे.

भाजपने पराभव मान्य करावा -

एकीकडे सर्वाधिक जागा जिंकल्याचे भाजपने म्हटले आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी सुद्धा सर्वाधीक जागा जिंकल्याचे म्हटले आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, आजच्या निकालातून राज्यभर भाजपची झालेली पिछेहाट हे भाजपच्या धोरणांचे अपयश आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना आपले गावही राखता आलेले नाही. भाजप नेत्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटी आकडेवारी जाहीर करून आपलाच पक्ष सर्वात मोठा असल्याचा खोटा दावा या निवडणुकीच्या निकालानंतरही केला आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा.

हेही वाचा-भाजपने जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा पराभव मान्य करावा - बाळासाहेब थोरात

ABOUT THE AUTHOR

...view details