मुंबई - राज्यसभेत भाजपच्या तीन जागा निवडून आल्यात आहेत. त्याप्रमाणेच विधान परिषदेमध्ये सुद्धा भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील, यात कुठलीही शंका नसल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. आमच्या आमदारांना त्यासाठी हॉटेलमध्ये डांबून ठेवण्याची आम्हाला गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यसभेत कसा बॉबस्फोट झाला तो महाविकास आघाडीला कळलाच नाही. आता पुन्हा त्यापेक्षा मोठा होईल, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजप प्रदेश कार्यालयात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक आज होत आहे. माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच महासचिव विनोद तावडे व इतर वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित असणार आहेत. भाजच्या आज होणाऱ्या बैठकीत बूथ रचना, शक्ती केंद्र याचा आढावा घेतला जाणार आहे.
अजित पवार यांनीच बोलण्यास नकार दिला -अजित पवारांना पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत देहू येथील कार्यक्रमात बोलायला संधी दिली नाही, त्यावरून राजकारण तापले आहे. त्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की अजित पवारच मी बोलणार नाही म्हणाले. मोदींची इच्छा होती अजित दादांनी बोलावे, पण ते बोलले नाहीत. तसेच हल्ली कशावरून गदारोळ होईल, हे सांगता येत नाही. भाषणासाठी अजित दादा उठलेच नाहीत. हा अपमानाचा विषय नाही. अजित दादांना बोलायला नाही, मिळाले तर राज्याचा अपमान कसा? देहूच्या संस्थानाला बोलायला मिळाले नसते, तर हा अपमान झाला असता, असे सांगत पाटील यांनी या वादावर पडदा टाकला.
आम्हाला दुसर्याची पर्वा नाही -दुसऱ्या पक्षात काय चालले याची काळजी घ्यायची नाही. आमच्या पक्षात देश प्रथम, नंतर पक्ष, आमची मते पक्षाला पडतील. आमचे एकही मत फुटणार नाही. आमची १०६ व अपक्षांची ६ अशी ११२ मते आम्हाला भेटतील. आम्ही फाटाफूट होऊ नये, म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये डांबून ठेवणार नाही. पण आता आम्हाला प्रशिक्षण द्यावे लागेल. कारण उमेदवार ११ आहेत. जागा १० आहेत, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेस संविधानाचा अपमान करत आहे -काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून सतत चौकशी केली जात आहे. यासाठी काँग्रेस आज राजभवनवर मोर्चा काढणार आहे. त्यावर बोलताना, असे मोर्चे काढून काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान केला जात आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.