महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केंद्राने भाजप नेत्यांना सुरक्षा दिली तर पवारांना का टोचतंय, भाजपचा चिमटा - sharad pawar news

एकूणच सरकार बदल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करणे हा प्रघात काही नवीन नाही. या आधीच्या सरकार मध्येही सुरक्षा कपातीचा मुद्दा गाजला होता. पण राज्याने सुरक्षा कपातीचा निर्णय घेतला असताना केंद्राने सुरक्षा पुरवणे हा मात्र नवा पायंडा राज्यात पडला आहे.

By

Published : Jan 22, 2021, 4:36 PM IST

मुंबई - केंद्राला वाटलं काही भाजप नेत्यांना सुरक्षेची गरज आहे. त्यानुसार त्यांना केंद्राने केंद्रीय औद्यीगिक सुरक्षा बलाची सुरक्षा दिली. तर शरद पवार यांना टोचण्यासारखं काय आहे, असा चिमटा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काढला आहे. भाजप नेते खासदार नारायण राणे यांना केंद्राने सीआयएसएफचीवाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. केंद्राने राज्यातील काही भाजप नेत्यांना सुरक्षा दिली. त्यावर शरद पवार यांनी टिका केली होती. त्या टिकेला केशव उपाध्ये यांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते शरद पवार-

कुणाला सुरक्षा द्यायची हा राज्याच्या अंतर्गत प्रश्न आहे. गृह विभागाच्या निकषात जे बसतात त्यांना सुरक्षा पुरवली जाते. पण यात केंद्राने हस्तक्षेप केल्याने आश्चर्य वाटत असल्याचे पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर सीआयएसएफची सुरक्षा लाभल्याने राणे यांना आता शांत झोप लागेल, असा टोला ही पवार यांनी लगावला.

पवारांचा हा टोला भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजपच्या नेत्यांना धमकी दिली जाते. किरीट सोमैय्या सारख्या नेत्यांना तर उघड पणे धमकावले जाते. त्यांना सुरक्षा पुरवली जात नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आसतांना त्यांची सुरक्षा कमी केली जाते. हे सूड बुद्धीचे राजकारण असल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केला. जर केंद्राने धोका असलेल्या नेत्यांना सुरक्षा दिली तर बिघडले कुठे असा प्रश्न उपाध्ये यांनी उपस्तिथ केला.

नारायण राणे, चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमैय्या यांना केंद्राची सुरक्षा-

महाराष्ट्र शासनाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. राणे यांची झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था काढून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. तर फडणवीस यांची झेड प्लस काढून त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. फडणवीस यांची बुलेटप्रूफ गाडी ही काढून घेण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांच्या वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली होती. यावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज्याच्या गृह विभागाने संबंधित व्यक्तीच्या जीविताला असलेला धोका याचा अभ्यास करून ही सुरक्षा कमी केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. मात्र हे सुडाचे राजकारण असल्याचा आरोप भाजपने केला होता. आता केंद्र सरकारने खासदार नारायण राणे, चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत ही कपात-

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था काढून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. ठाकरे यांची सुरक्षा कमी केल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना सुरक्षा देण्यासाठी कार्यकर्त्यांची फळीच उभी केली आहे. महाराष्ट्र रक्षक या नावाने राज ठाकरे यांना सुरक्षा देण्याचा निर्णय मनसे सचिव नयन कदम यांनी घेतला आहे.

एकूणच सरकार बदल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करणे हा प्रघात काही नवीन नाही. या आधीच्या सरकार मध्येही सुरक्षा कपातीचा मुद्दा गाजला होता. पण राज्याने सुरक्षा कपातीचा निर्णय घेतला असताना केंद्राने सुरक्षा पुरवणे हा मात्र नवा पायंडा राज्यात पडला आहे.

हेही वाचा-ग्रामपंचायत निकालाचा जल्लोष; कुठे महाविकास आघाडी तर कुठे भाजपची सत्ता

ABOUT THE AUTHOR

...view details