मुंबई -राज्यात राजकीय समीकरण बदलल्यावर भाजपाने शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याचा प्रत्यय महापालिकेच्या सुधार समितीत आला. कुलाबा येथील महापालिका शाळेचा आरक्षित भूखंड पालिकेने ताब्यात घ्यावा अशी भूमिका भाजपने यावेळी मांडली. तर संबंधित भूखंड अतिक्रमणग्रस्त असून ते हटवणे, खर्चीक बाब असल्याचा मुद्दा शिवसेनेने मांडला. दोन्ही पक्षाच्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाल्यावर सत्ताधारी शिवसेनेने प्रस्ताव राखून ठेवल्याने संतप्त झालेल्या भाजपने सत्ताधाऱ्यांचा निषेध करत सभात्याग केला.
भाजपचा सभात्याग -
कुलाबा येथील एकूण क्षेत्रफळ ७२५.७५ चौ.मी. या भूभागावरील महापालिका प्राथमिक शाळेच्या आरक्षणाबाबत जमीन मालकाने गेल्या २० जानेवारी राेजी खरेदी सुचना बजावली. या खरेदी सूचनेवर एक वर्षाच्या कालावधीत निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा आरक्षणावर पाणी साेडावे लागणार आहे. हा विषय सुधार समितीच्या बैठकीत चर्चेला आला असता भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा यांनी खरेदी सूचना त्वरित मंजूर केली पाहिजे आणि कुलाबा विभागातील नागरिकांना महापालिका प्राथमिक शाळा असे आरक्षण लवकरात लवकर उपलब्ध केले पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली. तर शिवसेनेच्या नगरसेविका श्रध्दा जाधव यांनी या खरेदी सूचनेचा प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठवावा, अशी उपसूचना मांडली.