मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय महत्वपूर्ण बैठक झाली, अशी माहिती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.
मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी सज्ज - भाजपा - मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई महापालिकेची निवडणूक केव्हाही झाली, तरी सत्ताधारी शिवसेनेला खाली खेचण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठीच आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडल्याची माहीती भाजपा नेते अँड आशिष शेलार यांनी दिली.
दुपारी बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत या चार तासांमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि काही जे गोवा आणि यूपीच्या निवडणुकीच्या कामासाठी आज उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याशी ऑनलाईनसुद्धा संपूर्ण चर्चा केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही झाल्या. तरी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चीत करण्यासाठीच्या, मुंबईतील जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा या स्वरूपाचा सर्व ठोस कार्यक्रम ठरला आहे, असे शेलार यांनी सांगितले. त्याबाबत आखणी करण्यासाठी, रचना लावण्यासाठी काही गोष्टींची उजळणी केली. काही आगामी कार्यक्रमांची तयारी सुद्धा सुरू झाली आणि या सगळ्या चर्चेतून पुन्हा एकदा नवीन जोमाने मुंबई महापालिकेत आता केवळ भाजपचे कमळ पुन्हा एकदा फुलणार असा संकल्प घेऊन आम्ही बैठक केली, असल्याची माहीतीही त्यांनी दिली.