महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई महापालिकेत आतापर्यंत 10 महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव, एकही झाला नाही मंजूर

मुंबई महापालिकेत एक नवा इतिहास लिहला जाणार का याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा सुरू झाले आहे. याचे कारण आहे मुंबई महापालिकेच्या महापौराविरोधात आणलेला अविश्वासदर्शक ठराव. हा ठराव मंजूर झाला तर पेडणेकर या पहिल्या अविश्वास ठरावामुळे पाय उतार होणाऱ्या महापौर ठरतील. कारण मुंबई महापालिकेत आतापर्यंत 10 महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव, एकही ठराव मंजूर झालेला नाही.

no-confidence motion in bmc
मुंबई महापालिकेत आतापर्यंत 10 महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव

By

Published : Sep 19, 2020, 8:04 AM IST

मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात भाजपाने अविश्वास ठराव मांडला आहे. महापौरांविरोधात अविश्वास ठराव भाजपाने मांडल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र पालिकेच्या 128 वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत 10 महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आले. त्यापैकी एकही अविश्वास ठराव मंजूर झालेला नाही. यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव पालिकेतील इतिहासाची पुनरावृत्ती करणार की नवा इतिहास लिहिणार, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

या कारणासाठी अविश्वास ठराव -

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रसार होत आहे. या दरम्यान रुग्णांवर उपचारासाठी, जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यासाठी, औषधे, यंत्रे खरेदीसाठी सहाशे कोटींहून अधिक रक्कम पालिका प्रशासनाने खर्च केली आहे. ही रक्कम खर्च करताना पीपीई किट, ग्लोज, मास्क पासून मृतदेह बंदिस्त करण्याच्या बॅगामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. हा सर्व खर्च पालिकेच्या स्थायी समिती आणि सभागृहाची मंजुरी न घेता करण्यात आला आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर व आयुक्त इकबाल सिंग चहल यांना अनेक पत्र देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे.

मुंबई महापालिकेत आतापर्यंत 10 महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव

पालिकेत नगरसेवकांच्या संखेनुसार राजकीय पक्षांना विकास निधी दिला जातो. यावर्षी सत्ताधारी शिवसेनेने स्वतःला 73 टक्के निधी घेतला तर भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी आदी पक्षांना नगण्य असा निधी दिला. महापौरांनी गेल्या सहा महिन्यात पालिका सभागृहाची एकही बैठक घेतलेली नाही. आदी प्रश्नांच्या मुद्द्यावरून महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव आणल्याचे भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी घोषित केले आहे.

तर इतिहास नव्याने लिहिला जाणार -

मुंबई महापालिकेच्या 128 वर्षांच्या इतिहासात 77 महापौर विराजमान झाले. त्यापैकी 10 महापौरांवर अविश्वास ठराव मांडण्यात आला. मात्र त्यापैकी एकही अविश्वास ठराव मंजूर झालेला नाही. कधी राजकीय पक्षांनी सभात्याग केल्याने तर कधी सभा गुंडाळण्यात आल्याने अविश्वास ठराव मंजूर झालेले नाहीत. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. भाजपाला हा अविश्वास ठराव मंजूर करून घेण्यासाठी पालिकेतील विरोधी पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष यांचा पाठिंबा लागणार आहे. विरोधी पक्ष कोणती भूमिका घेतात यावर हा अविश्वास ठराव अवलंबून असणार आहे. विरोधी पक्षांनी भाजपाला मदत केली नाही तर हा अविश्वास ठराव मंजूर होणार नाही. महापालिकेच्या सभागृहात लवकरच या अविश्वास ठरावावर चर्चा आणि मतदान होऊ शकते, यामुळे यावेळी अविश्वास ठराव नामंजूर होऊन पालिकेतील इतिहासाची पुनरावृत्ती होणार की हा प्रस्ताव मंजूर होऊन नवा इतिहास लिहिणार याकडे पालिकेतील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

या महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव -

1936 - 37 या काळात महापौर असलेले जमनादास मेहता यांच्या विरोधात 31 ऑगस्ट 1936 रोजी,

1942 - 43 या कालावधीतील युसूफ मेहरअली यांच्या विरोधात 17 सप्टेंबर 1942 रोजी,

1949 - 50 या कालावधीतील स. का. पाटील यांच्या विरोधात 15 सप्टेंबर 1949,

1955 - 60 या कालावधीतील एन. सी. पुपाला यांच्या विरोधात 12 डिसेंबर 1955,

1962 - 63 या कालावधीतील एन. एस. शाह यांच्या विरोधात 6 ऑगस्ट 1962 रोजी,

1968 - 69 या कालावधीतील डॉ. आर. कुलकर्णी यांच्या विरोधात 12 ऑगस्ट 1968 रोजी,

1079 - 80 या कालावधीतील राजाभाऊ चिंबुलकर यांच्या विरोधात 16 ऑगस्ट 1979 रोजी,

1992 - 93 या कालावधीतील चंद्रकांत हंडोरे यांच्या विरोधात 29 जून 1992 रोजी,

1993 - 94 या कालावधीतील आर. आर. सिंग यांच्या विरोधात 30 ऑगस्ट 1993 रोजी,

1998 - 99 मध्ये पालिकेत महापौर परिषद असताना अध्यक्ष गजानन ठाकरे यांच्या विरोधात 20 ऑगस्ट 1998 रोजी तर

तर 2005 - 2007 या कालावधीतील दत्ता दळवी यांच्या विरोधात 17 ऑक्टोबर 2005 रोजी अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. मात्र यापैकी एकही अविश्वास ठराव मंजूर झालेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details