मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रविवारी देशातील सर्व जनतेने घरातून 9 मिनिटे दिवे लावून प्रकाश करण्याचे आवाहन केले. मात्र, मोदींच्या या आवाहनानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील काही मंत्र्यांचा समावेश आहे. यावर बोलताना भाजपचे आमदार राम कदम यांनी, राज्यातील मंत्र्यांनी बाकी गोष्टींवर भाष्य करण्यापेक्षा राज्यात लोकांचे हाल होत आहेत. त्याकडे पाहणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.
आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...चूल पेटण्याची गोष्ट होईल वाटलं होत... मात्र, नवाब मलिक यांची पंतप्रधान मोदींवर टीका
मोदींच्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खोचक टीका केली होती. राम कदम यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून त्यांच्या टीकेचा प्रतिवाद केला आहे.
'कोरोना विरोधात एकजुटीने सगळे या संकटाशी लढत आहेत. या अंधःकारातून मार्ग काढताना एक आशेचा किरण म्हणून प्रत्येकाने प्रकाशाचा दिवा हाती घेऊन एकतेचा संदेश द्यावा, असे पंतप्रधान मोदींना अपेक्षित आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील काही नेत्यांना तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या या दिव्याचे महत्त्व कळलेले नाही' असे राम कदम म्हणाले आहेत.
हेही वाचा...देशाला इव्हेंटची नाही तर...बाळासाहेब थोरातांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
केंद्र सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या कोट्यावधी लोकांसाठी मोफत धान्य राज्य सरकारला दिले आहे. ते मोफत धान्य कुठे गेले ? याबद्दल हे राज्य सरकार बोलत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या सरकारने अजूनपर्यंत एक किलोही मोफत धान्य कोणत्याही गरिबांपर्यंत पोहोचवले नाही ? लोक भुकेने मरतत आहेत. डॉक्टरांना सेफ्टी किट नाही. त्याकडे लक्ष द्यायला हवे. मात्र, त्या ऐवजी मंत्री मोदी काय बोलले याच्यावर टीका करत आहेत. त्यापेक्षा ही वेळ टीका करण्याची नाही, तर लोकांना मदत करण्याची आहे, असा टोला मोदींवर टिका करणाऱ्यांना भाजपचे आमदार राम कदम यांनी लगावला आहे.